Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. आज दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 1314 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार 85 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत 1 हजार 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यामध्ये 44 पुरुष आणि 20 स्त्रियांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या मुंबई शहरात आहे. मुंबईत दररोज 1 हजार पेक्षा अधिक रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (वाचा - मुंबईतील COVID19 च्या रुग्णांसाठी बेड्सची सोय करण्यासाठी महापालिकेकडून वॉर्ड वॉर रुमची स्थापना)

दरम्यान, आज मुंबईत 842 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 22 हजार 38 झाली आहे. धारावीत आज 12 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तेथील एकूण रुग्णांचा आकडा 1924 वर पोहोचला आहे.