देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोविडच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड आणि क्वारंटाईन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची संख्या राज्यात वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड्सची सोय करुन देण्यासाठी महापालिकेकडून वॉर्ड वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णवाहिकेची सोय करुन देण्याची जबाबदारी पालिका सहाय्यक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास गैरसोय होत आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाच्या रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल चहन यांनी वॉर्ड वॉर रुम स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या ठिकाणी सकाळी 8 वाजता साथ नियंत्रण विभागाकडून पॉझिटिव्ह कोरोनाच्या रुग्णांची ऑनलाईन माहिती देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर वॉर रुम मधील डॉक्टरांकडून पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत की नाही ती माहिती घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ही माहिती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, क्वारंटाइन किंवा होम क्वारंटाइन करण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.(Mumbai Police: कोरोना संशयित पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याच्या व्हायरल व्हिडिओेचे मुंबई पोलिसांकडून खंडण)
दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा राज्यात येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार आहे. तसेच नागरिकांना सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घराबाहेर पडताना स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात आज कोरोनाचे नवे 2553 रुग्ण आढळले तर 109 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 88,528 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.