Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 120 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर एकाचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

Coronavirus Cases In Maharashtra Police: देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत अनेक कोरोना योद्धे कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 120 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13,716 इतकी झाली आहे.

सध्या राज्यात 2 हजार 528 कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 11 हजार 49 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत 139 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Vocalis Healthcare Initiative: व्हॉईस बायोमार्कर्सद्वारे कोरोना संशयित रुग्णाच्या आवाजावरुन कोरोना चाचणी करणे शक्य होणार; गोरेगावमध्ये व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाला सुरूवात)

दरम्यान, राज्यात रविवारी 10,441 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. तसेच 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,82,383 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 4 लाख 88 हजार 271 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.55 टक्के असून रविवारी 8 हजार 157 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.