राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला (National Polio Vaccination Campaign) 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली आहे. मात्र, यवतमाळमधील (Yavatmal) प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर (Sanitizer) पाजल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुले 1 ते 5 वयोगटातील आहेत. या घटनेनंतर पालकवर्गांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 मुलांना सॅनिटायजर पाजण्यात आले. सुरुवातीला मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याची माहिती समोर आली. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जात आहे. ज्यावेळी या मुलांना लस देण्यात आली, त्यावळी लसीकरणावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. मात्र, नेमकी ही चूक कोणाकडून झाली? याचा तपास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत. हे देखील वाचा-Nagpur Family Commits Suicide: हृदयद्रावक घटना! नागपूर येथे 12 वर्षीय मुलीसह एका दापम्त्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
या घडलेल्या प्रकारानंतर पालकवर्गांकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. तसेच लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. दरम्यान, यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.