नुकत्याच दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत, बारावीच्याही काही दिवसांत संपतील. परीक्षा संपल्यावर जवळजवळ प्रत्येक कुटुंबात घडणारी गोष्ट म्हणजे मुलांना घेऊन बाहेर फिरायला जाणे. हा उन्हाळ्याच्या काळ असल्याने सहसा थंड हवेच्या ठिकाणांना भेटी दिल्या जातात. तुम्हाला देखील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये बाहेर फिरायला जायचे आहे पण नेमके कुठे जावे हे कळत नाहीये. तर तुमच्यासाठी आम्ही काही हटके ठिकाणांची माहिती सांगणार आहोत. भारतातल्या भारतात अगदी माफक खर्चात तुम्ही या ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.
माऊंट अबू (राजस्थान) - राजस्थानातील माऊंट अबू हे ठिकाण खास उन्हाळी पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जाण्यासाठी काही दिवस तरी नक्कीच राखून ठेवा. आरवली पर्वतातले हे सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे त्यामुळे उन्हाळ्यात इथे अजिबात उकाड्याचा त्रास होत नाही. राजस्तानमधील इतर ठिकाणांपेक्षा माऊंट अबू हे त्यातल्या त्यात स्वस्त ठिकाण आहे.
शिलॉंग (मेघालय) – उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे एक बेस्ट ठिकाण आहे. येथील शांत आणि दूरपर्यंत पसरलेला उमियाम तलावाचा नजारा पाहण्यासारखा असतो. या ठिकाणास स्कॉटलॅंड ऑफ द ईस्ट या नावानेदेखील ओळखले जाते. येथे असणारे लांब-लांब पाइनची झाडे, पायनाप्पलची झाडे पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येथे येत असतात. रहदारीपासून दूर, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर याठिकाणी अनेक स्पॉट उपलब्ध आहेत. जंगलातून पायी फिरणे, ट्रॅकिंगसोबतच वेगवेगळ्या रोमांचक अॅक्टिविटीही करू शकता. हे थोडे अडवळणावरचे ठिकाण आहे त्यामुळे इथले पर्यटन त्यामानाने स्वस्त आहे. (हेही वाचा: भारतातील या ठिकाणी भारतीयांना जाण्यास बंदी; परदेशी नागरिक घेऊ शकतात उपभोग)
कुर्ग (कर्नाटक) – उटी हे कर्नाटकमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे मात्र आता लोकांचा ओढ कुर्गकडेही दिसून येतो. कुर्ग हे चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लांबच्या लांब रस्त्यावर तुम्ही मनोसोक्त भटकंती करू शकता. इथे 6 हजार रुपयांत 3 दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत. कुर्गच्या आसपास अब्बे फॉल, बेरा फॉल रिव्हर, नल्कनाद पॅलेस, ब्रह्मागिरी पीक, नामद्रोलिंग मोनेस्टरी, इरुप्पु फॉल आणि कावेरी रिव्हर सारखे अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
रानीखेत (उत्तराखंड) - हे ठिकाण येथील शांततेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. साहसी दृष पाहण्यास आवड असणा-या व्यक्तींसाठी येथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. उत्तराखंडात वसलेले रानीखेत हे सुंदर हिल स्टेशन असून अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी देखील रानीखेतमधील लोकेशन्स प्रसिद्ध आहेत. कुमांऊच्या पर्वतांमध्ये करण्यात येणारे पॅराग्लाइडिंग तुम्हाला एका वेगळ्याच विश्वास घेऊन जाईल. कुमाऊंचे राजा सुखदेव यांची पत्नी पद्मावतीला रानीखेतची सुंदरता इतकी आवडली की त्यांनी कायमचे या ठिकाणी राहण्याचा निश्चय केला तेव्हापासून या ठिकाणाचे नाव रानीखेत असे पडले.