कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले. राज्यातील पर्यटनाचे वैभव जपा, जोपासा, वाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा, असे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कोविडचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत, हे करीत असताना नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून ‘महा’राष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईल, असा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहील, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सर्वांगीण विकासासाठी पर्यटन’ हे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. राज्यात गड किल्ले, किनारपट्टी, साहसी पर्यटन, धार्मिक स्थळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. (हेही वाचा: World Tourism Day 2021: जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाणून घ्या महाराष्ट्रातील UNESCO जागतिक वारसा स्थळे व त्यांची माहिती)
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोविडनंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या 80 वरून 10 वर आणली, 15 ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती त्याऐवजी आता केवळ नऊ स्व-प्रमाणपत्र आवश्यक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचे सुद्धा उदघाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.