Water Sports | PC: Pixabay.com

मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी (Tarkarli Beach) दोन दिवसांपूर्वी एक प्रवासी बोट बुडाल्याने 2 पर्यटकांचा हकनाक जीव गेला. दरम्यान स्कुबा डायव्हिंग करून परत येताना ही दुर्घटना झाली. यावेळी पर्यटकांना लाईफ जॅकेट्स देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता तारकर्ली समुद्र किनारी चालवण्यात येणारा वॉटर स्पोर्ट्सचा धंदा किती सुरक्षित आहे? यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बोट बुडून झालेल्या दुर्घटनेनंतर आता सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरू असलेल्या पर्यटनाला थोडा ब्रेक लागला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार आता हे वॉटरस्पोर्ट्स आणि प्रवासी होडी सेवा 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

तारकर्ली च्या समुद्रकिनारी झालेल्या दुर्घटनेला अनधिकृत स्कुबा डायव्हिंग कारण असल्याचा दावा नुकताच स्थानिक सरपंचांनी केला आहे. यामध्ये प्रशासनाने कारवाई केली नाही तर आपण जनहित याचिका दाखल करू असे देखील त्यांनी म्हटलं होतं. आता प्रशासनाने या घटनेची दखल घेत प्रवासी होडी सेवा बंद केली आहे. किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने प्रवासी वाहतुकीसाठी मुदतवाढ मागितली आहे. मात्र मुदतवाढ देण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी घेतील असे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सुरज नाईक यांनी माहिती दिली असल्याचं एबीपीच्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

कोकणाला सागरी किनार्‍याचं मोठं वैभव लाभलं आहे. या वैभवाचा वापर पर्यटन वाढवण्यासाठी करण्याच्या उद्देशाने काही वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, दांडी, कुणकेश्वर, देवगड समुद्र किनाऱ्यावर अनेक वॉटर स्पोर्ट्सना चालना देण्यात आली आहे. मात्र यामध्ये काहीजण अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान या समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंग सोबत बनाना राईड्स, जेट स्की, पॅरासिलिंग सारखे साहसी वॉटर स्पोर्ट्स खेळले जातात. सध्या मान्सूनही वेशीवर आल्याने समुद्रामध्ये बदल होत असतात. वार्‍याचाही वेग  वाढत असल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.