Tarkarli Beach Accident: तारकर्ली बीच वरील अनधिकृत स्कुबा डायव्हिंग थांबवा; सरपंचाची मागणी
Scuba | Pixabay.com

मालवणच्या (Malvan) तारकर्ली समुद्रकिनारी (Tarkarli Beach) काल (24 मे) एक बोट बुडाल्याने 2 पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेल्या पर्यटकांना घेऊन येताना ही दुर्घटना घडली. यामध्ये प्रवाशांकडे लाईफ जॅकेट्स नसल्याने त्यांना वाचवणं कठीण झाले आणि 2 जणांचा हकनाक बळी गेला. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. नक्की वाचा: Tarkarli Beach Accident: तारकर्ली समुद्र किनारी स्कुबा डायव्हिंग करून येणार्‍या प्रवाशांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू .

दरम्यान महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार अनधिकृत स्कुबा डायव्हिंग या दुर्घटनेला जबाबदार आहे. यावर प्रशासनाचा वचक नसल्याने अनधिकृत स्कुबा डायव्हिंग सर्रास तारकर्ली बीचवर सुरू असते. स्थानिक सरपंच मीना केरकर यांनी याबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास जनहित याचिका दाखल केली जाईल असं म्हटलं आहे.

तारकर्ली बीच वरील दुर्घटनेमध्ये 2 जण मृत्यूमुखी पडले. ते बीचवर एमटीडीसी च्या पर्यटन निवासी मध्ये थांबले होते. त्यांनी एमटीडीसीच्या अधिकृत स्कुबा डायव्हिंग ऐवजी अनधिकृत स्कुबा डायव्हिंग निवडले आणि त्यामध्ये जीव गमावला. मृतांपैकी एक पेशाने डॉक्टर होता तर दुसरा मृत व्यक्ती एका आमदाराचा भाचा होता.

लाटेवर हेलकावा घेऊन बोट पलटली आणि बोटीतील प्रवाशांच्या नाका-तोंडात पाणी गेले. तातडीने सार्‍यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले पण तरीही 2 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित प्रवाशांवर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात आले.

काही महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्ग मध्ये चिपी एअरपोर्ट देखील सुरू झाले आहे त्यामुळे आता सिंंधुदुर्ग जिल्ह्यांत पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गोव्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पर्यटकांंमुळे समुद्र किनारे, हॉटेल्स फुल्ल असतात त्यामुळे अनेकदा राज्यातील पर्यटकांची पसंती कोकणातील समुद्र किनार्‍यांना असते. कोकणात सध्या मागील काही दिवसांपासून पूर्व मोसमी पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे समुद्राचा अंंदाज घेऊन आनंद लुटण्याचं आवाहन आहे.