जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) विस्तारा एअर लाईन्सने (Vistara Airlines) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 8 मार्च म्हणजेच महिला दिनापासून विस्तारा एअर लाईन्स महिलांसाठी खास सुविधा सुरु करत आहे. आता तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला फ्री सॅनिटरी पॅड्स पुरवण्याची सुविधा विस्तारा एअर लाईन्सने सुरु केली आहे. सध्या देशांतर्गत विमानप्रवासात महिलांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. असा निर्णय घेणारी विस्ताराही देशातील पहिली एअरलाईन्स ठरत आहे.
विस्तारा एअरलाईन्समध्ये पुरवण्यात येणारे पॅड्स हे ISO 9001:2015 सर्टिफाईड बायो डिग्रेडेबल आणि ऑर्गेनिक असतील. हे नॅपकिन्स प्लॉन्ट बेस फायबर पासून बनवलेले असून ते प्लॉस्टिक, टॉक्सिन्स आणि परफ्युम विरहीत असतील. कंपनीने ट्विट करत #PadsOnBoard हा हॅशटॅग वापरुन या नव्या सुविधेची माहिती दिली.
तसंच महिला दिनापासून सर्व क्रु मेंबर्स विमानात सॅनिटरी पॅड्सबद्दल माहिती देतील. गरजेनुसार तुम्ही अगदी मोकळेपणाने विमानप्रवासात सॅनिटरी पॅडची मागणी करु शकता. या निर्णयाबद्दल विस्ताराच्या उपाध्यक्ष दीपा छडा यांना सांगितले की, "सॅनिटरी पॅड पुरवण्याबद्दल उचलले पाऊल आमच्या प्रवाशांसाठी फार महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण असेल. यातूनच लहान गोष्टी मोठ्या परिणाम घडवतात, हे दिसून येईल."
तसंच पुढे त्या म्हणाल्या की, "एक महिला असल्याने असा निर्णय घेणाऱ्या संस्थेशी मी संलग्न असल्याचा मला अभिमान आहे. यामुळे गरजेच्या वेळी अनेक प्रवाशांची मदत होईल."
महिलांच्या स्वास्थ आणि सुरक्षेचा विचार करण्याकडे विस्ताराने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. 2017 मध्ये कंपनीने सुरु केलेल्या #VistaraWomanFlyer service च्या दृष्टीने हे दुसरे पाऊल आहे. 2017 मध्ये सुरु केलेल्या Vistara Woman Flyer service अंतर्गत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासंबंधित सेवा पुरवण्याचा निर्णय विस्तारा एअर लाईन्सने घेतला होता.