
Travel Trends In India: सध्या भारतामध्ये प्रवास करण्याचा ट्रेंड वाढत असलेला दिसत आहे. पर्यटन स्थळांपासून ते धार्मिक स्थळांपर्यंत विविध ठिकाणांना लोक भेट देत आहेत. अहवालानुसार, अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ यांसारख्या अध्यात्मिक स्थळांना भेट देण्याची मागणी वाढत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत धार्मिक स्थळांसह किंवा त्याच्या आसपासच्या ठिकाणांचा शोध 97% ने वाढला आहे, ट्रॅव्हल वेबसाइट मेकमायट्रिपच्या (MakeMyTrip) अहवालानुसार, 2023 मध्ये अयोध्येला भेट देण्यासाठी लोकांनी 585 टक्के अधिक सर्च केले आहे.
या अहवालानुसार धार्मिक स्थळांना भेटी देण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. उदाहरणार्थ, 2023 मध्ये, गेल्या वर्षीच्या तुलनेत अयोध्यानंतर उज्जैन (359%) आणि बद्रीनाथ (343%) प्रवासासाठी खूप जास्त सर्च केले गेले आहे. मेकमायट्रिपच्या अशा पहिल्या ट्रॅव्हल ट्रेंड रिपोर्टमध्ये 10 कोटींहून अधिक सक्रिय वापरकर्त्यांचा ट्रॅव्हल सर्च डेटा समाविष्ट आहे.
या अहवालात असेही दिसून आले आहे की, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त 2019 च्या तुलनेत 2023 मध्ये वर्षातून 3 पेक्षा जास्त ट्रिप करणाऱ्या लोकांच्या संख्येत 25% वाढ झाली आहे. वीकेंडच्या सहलींबद्दल बोलायचे झाल्यास, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी 131% अधिक शोध घेतले गेले. त्याचप्रमाणे उटी आणि मुन्नार ही देखील वीकेंड ट्रीपसाठी आवडती ठिकाणे ठरली आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये कौटुंबिक प्रवास बुकिंग 64% वाढले आहे, तर सोलो ट्रॅव्हलिंग बुकिंग 23% वाढले आहे. (हेही वाचा: Schengen Visa New Rules: भारतीयांना युरोपातील 29 देशांमध्ये प्रवास करणे झाले सोपे; युरोपियन युनियनने जारी केले शेंगेन व्हिसाचे नवे नियम, घ्या जाणून)
परदेशातही फिरायला जाण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. अहवालानुसार, दुबई, बँकॉक आणि सिंगापूर ही सर्वात जास्त सर्च केलेली परदेशी ठिकाणे आहेत. याशिवाय, लंडन, टोरंटो आणि न्यूयॉर्क हे देखील सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या शहरांपैकी आहेत. 2023 मध्ये नवीन परदेशी ठिकाणांच्या शोधात अनेक पटींनी वाढ झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. यामध्ये हाँगकाँग, अल्माटी, पारो, बाकू, दा नांग आणि तिबिलिसी या ठिकाणांचा समावेश आहे.