Thailand Waives Visas for Indians: भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर! आता थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही, जाणून घ्या सविस्तर
Wat Arun, Thailand (Photo Credits: Pexels)

थायलंड (Thailand) प्रवासाचा विचार करणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. थायलंडने भारतीयांसाठी व्हिसा माफीची घोषणा केली आहे. थायलंडच्या सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारत आणि तैवानमधून येणाऱ्या लोकांसाठी व्हिसाची आवश्यकता माफ केली जाईल. रॉयटर्सच्या मते, ही सूट 10 नोव्हेंबर 2023 ते मे 2024 पर्यंत दिली जाईल. थायलंड सरकारचे प्रवक्ते चाय वाचारोन्के यांनी सांगितले की, भारत आणि तैवानमधून येणारे लोक 30 दिवसांसाठी व्हिसाशिवाय थायलंडमध्ये राहू शकतात.

थायलंड प्रवाशांसाठी व्हिसा नियम शिथिल करण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहे, ज्यात व्हिसा माफी आणि पर्यटकांसाठी राहण्याचा कालावधी वाढवणे या बाबी समाविष्ट आहेत. भारतीय पर्यटक आता थायलंडमध्ये 30 दिवस राहू शकतात. सध्या, भारतातील प्रवाशांना थायलंडमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलसाठी 2,200 भात (किंवा अंदाजे 5,100 रुपये) भरावे लागतात.

या महिन्याच्या सुरुवातीला थायलंडने रशियन नागरिकांना एप्रिल 2024 पर्यंत 90 दिवसांपर्यंत व्हिसा-मुक्त भेट देण्याची परवानगी दिली होती. थायलंड सरकार आपली मंद अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी परदेशी पर्यटकांच्या आगमनावर अवलंबून आहे. थायलंडच्या नवीन सरकारचे उद्दिष्ट हे पुढील वर्षी परदेशी पर्यटकांकडून महसूल 3.3 ट्रिलियन बाथपर्यंत वाढवण्याचे आहे. ज्यामध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री सर्वोत्तम आर्थिक उत्तेजन देते.

बँक ऑफ थायलंडच्या आकडेवारीनुसार, पर्यटनाचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 12% वाटा असून, नोकऱ्यांमध्ये सुमारे एक पंचमांश योगदान आहे. फुकेत टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष थानेथ तंतिपिरियाकीज यांनी ऑगस्टमध्ये ब्लूमबर्गला सांगितले की चीन आणि भारतातील प्रवाशांना व्हिसा सूट देण्याच्या तुलनेत अर्ज शुल्क काढून टाकणे योग्य ठरेल. दरम्यान, याआधी श्रीलंकेने आपल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि गेल्या वर्षीच्या आर्थिक संकटानंतर अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून भारतीयांसाठी व्हिसा शुल्क माफ केले होते.