Shri Ramayana Express: चैत्र नवरात्रीनिमित्त करा रामाशी संबंधित धार्मिक स्थळांचे दर्शन; 28 मार्चपासून सुरु होत आहे श्री रामायण एक्सप्रेस; जाणून घ्या मार्ग व दर
Shri Ramayana Express (Photo Credits: Wiki Commons)

हिंदू धर्मातील प्रचलित मान्यतेनुसार, मां दुर्गाचा जन्म चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला होता आणि दुर्गाच्या आदेशावरूनच ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होते. यंदाच्या चैत्र नवरात्रीचे औचित्य साधून आयआरसीटीसीने (IRCTC) भगवान रामशी संबंधित असलेल्या धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणारी यात्रा आयोजित केली आहे. श्री रामायण एक्सप्रेस (Shri Ramayana Express) असे या रेल्वेचे नाव आहे.

28 मार्च रोजी नवी दिल्लीपासून या रेल्वे प्रवासाला सुरुवात होणार आहे. 16 रात्री आणि 17 दिवसांच्या पॅकेज टूरच्या या ट्रेनला 10 डबे असतील. यात पाच स्लीपर क्लास आणि पाच एसी थर्ड क्लास कोच असतील.

या यात्रेसाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाशिवाय सफदरजंग, गाझियाबाद, मुरादाबाद, बरेली आणि लखनऊ रेल्वे स्थानकांवरूनही प्रवास सुरू करता येईल. महत्वाचे म्हणजे या यात्रेमध्ये तुम्ही श्रीलंकामधीलही काही ठिकाणांचे दर्शन घेऊ शकणार आहात.

या धार्मिक स्थळांचे दर्शन -

श्री रामायण एक्स्प्रेस अयोध्यातील रामजन्मभूमी आणि हनुमान गढी, नंदीग्राममधील भारत मंदिर, सीतामढी (बिहार) मधील सीता माता मंदिर, जनकपूर (नेपाळ), वाराणसीतील तुळशी मानस मंदिर आणि संकट मोचन मंदिर, सीतामढी (यूपी) मधील सीतामढी स्थळ, प्रयागमधील त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर आणि भारद्वाज आश्रम, श्रींगवरपुरातील श्रींगी ऋषि  मंदिर, चित्रकूटमधील रामघाट व सती अनुसूया मंदिर, नाशिकमधील पंचवटी, हंपीतील अंजनाद्री हिल आणि रामेश्वरममधील ज्योतिर्लिंग शिव मंदिर अशा धार्मिक स्थळांना भेट देईल.

दर- 

नॉन-एसी कोच बुकिंगसाठी, प्रति व्यक्ती 16,065 रुपये आणि एसी कोचसाठी तुम्हाला प्रत्येकी 26,775 रुपये द्यावे लागतील. श्री रामायण एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान श्रीलंकेच्या प्रवासासाठी 40 जागा ठेवण्यात आल्या आहेत. श्रीलंकेतील धार्मिक स्थळांना भेट द्यायची इच्छा aसणार्‍या प्रवाशांना 15 व्या दिवशी म्हणजेच, 11 एप्रिल रोजी चेन्नईवरून विमानाने कोलंबो येथे नेले जाईल. पुढील तीन दिवस श्रीलंकेत कॅंडी, नुवारा एलीया आणि नेगो बो यांची यात्रा पार पडेल. याठिकाणी सीता माता मंदिर, अशोक वाटिका, विभीषण मंदिर अशा स्थळांना भेट दिली जाईल. यानंतर,  यात्रेकरूंना 15 एप्रिल रोजी कोलंबोहून दिल्लीला आणले जाईल. (हेही वाचा: राम राम बोलण्यास नकार दिल्याने महिलेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न; मद्यधुंद आरोपी तरुणांना अटक)

यासाठी प्रति व्यक्ती 41700 रुपये, दोन व्यक्तींच्या एकत्र बुकिंगसाठी 37800 रुपये प्रती व्यक्ती, तीन लोक हे टूर पॅकेज एकत्र घेत असल्यास, प्रत्येक व्यक्तीला 36950 रुपये द्यावे लागतील. जर लहान मुलासाठी स्वतंत्र बेड घ्यायचा असल्यास,  29800 रुपये, स्वतंत्र बेड न घेतल्यास 28050 रुपये द्यावे लागतील.

या यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी शुद्ध शाकाहारी आणि उपवासाच्या भोजनाची व्यवस्था केली जाईल.