
आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 (Deccan Odyssey Luxury Train 2.0) नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी 2.0 या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक 18 येथे, गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी उपस्थित असतील.
मान्यवरांना घेऊन ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास करणार आहे. देशातील प्रसिद्ध 4 शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 उद्यापासून सुरु होईल.
या ट्रेनमध्ये उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देण्यात येतात. सन 2004 ते 2020 पर्यंत या आलिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू होत आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे.
डेक्कन ओडिसी ही भारतातील प्रसिद्ध पॅलेस ऑन व्हील्सप्रमाणेच सर्वात आलिशान ट्रेन आहे. महाराष्ट्राचे सौंदर्य जवळून पाहण्यासाठी या ट्रेनपेक्षा दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही. ही ट्रेन भारतीय रेल्वे चालवते. या लक्झरी ट्रेनची खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला 16 व्या शतकातील राजांचे जीवन आणि राजेशाही शैली अनुभवायला मिळते. (हेही वाचा: Mumbai International Festival: पुढील वर्षी 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन; अनेक ॲक्टिव्हीटीज, खाद्यपदार्थ, शॉपिंगसह अनुभवायला मिळणार विविध गोष्टी)
यात 21 लक्झरी कोच आहेत, त्यापैकी 11 लक्झरी निवास म्हणून वापरले जातात आणि उर्वरित लाउंज, स्पा, खाद्यपदार्थ, कार्यक्रम आणि इतर गोष्टींसाठी वापरले जातात. लक्झरी सुविधांव्यतिरिक्त, प्रवाशांना इंटरनेट, एसी, उत्तम जेवण आणि बरेच काही प्रदान केले जाते. तुम्ही प्रेसिडेन्शियल सूट आणि डिलक्स केबिन यापैकी काहीही निवडू शकता. दोन्ही केबिन सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. या ट्रेनची तिकीट किंमत सुमारे 5 लाख 46 हजार रुपयांपासून सुरू होते. या ट्रेनच्या सर्व डब्यांना महाराष्ट्र राज्यातील विविध भागांची नावे देण्यात आली आहेत.