मुंबई शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर 20 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे (Mumbai International Festival) आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील प्रथितयश स्टेक होल्डर्स सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.
मंत्री महाजन यांची उद्योगपती महिंद्रा यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी पर्यटन विषयावर विस्तृत चर्चा झाली. मंत्री महाजन म्हणाले की, मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या फाऊंडेशनमध्ये शासकीय व अशासकीय सदस्यांचा समावेश असेल. फाऊंडेशनच्या निर्मितीमुळे अशा महोत्सवांच्या आयोजनात सातत्य राहील व पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक, स्टेक होल्डर्स, मुंबईतील उद्योजक व इतर क्षेत्रातील प्रथितयश व्यक्तींच्या सहभागामुळे महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळणार आहे.
राज्याच्या कला व संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला, विविध खाद्य संस्कृती, सायकलिंग टूर, हार्बर टूरिझम,वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टिव्हीटीज आदी साहसी क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये सीटी टूर आयोजकांना एका छत्राखाली आणून शॉपिंग मॉल, कला दालने, चित्रपटगृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाइडेड सीटी टूर, हेरिटेज वॉक, नेचर वॉक, फोटोग्राफी, योगा कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक व स्टेक होल्डर्स यांचा समावेश असलेल्या परिचय सहल (FAM Tour), चित्रपट, फॅशन शो इ. उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. (हेही वाचा: राज्यातील पाच सागरी जिल्ह्यांना केंद्राकडून दिलासा; मिळणार अनेक पायाभूत सुविधा व पर्यटनाला चालना, जाणून घ्या सविस्तर)
या महोत्सवामुळे पर्यटना व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढीस मदत होईल, मुंबईतील पर्यटन वृद्धीस चालना मिळून राज्याच्या महसुलात देखील वाढ होईल, असे पर्यटन मंत्री महाजन यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी-सुविधा देण्याबरोबरच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री महाजन यांनी सांगितले.