नोव्हेंबरमध्ये भेट देऊ शकता या सुंदर स्थळांना
भूतान (Photo Credit : pixabay)

नेहमीच असे होते, आपण खूप दिवसांपासून रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून थोड्या दिवसांचा ब्रेक घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जायचा विचार करतो. मात्र काही ना काही कारणांनी हा प्लॅन पूर्णत्वाला जातच नाही. तुमच्याही बाबतीत असे घडत असेल तर नोव्हेंबर महिना हा बाहेर फिरायला जाण्याचा उत्तम महिना ठरू शकतो. कारण या महिन्यात जितक्या सुट्ट्या मिळू शकतात तितक्या दुसऱ्या कोणत्या महिन्यात क्वचितच येतात. त्यामुळे येणाऱ्या सुट्ट्यांचा अंदाज घ्या आणि सोलो ट्रीप, कुटुंबासोबतची ट्रीप, मित्रांसोबतची ट्रीप अशा कोणत्याही ट्रीपचे तुम्ही आयोजन करू करा.

दिवाळीच्या दिवसांत सहसा मुलांच्या शाळेला सुट्ट्या असतातच, अशात 3 नोव्हेंबरला शनिवार, 4 नोव्हेंबरला रविवार आणि 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी दिवाळीची सुट्टी. त्यानंतर फक्त 9 नोव्हेंबरला शुक्रवार आणि परत 10, 11 ला सुट्टी. यामध्ये तुम्ही 5, 6 आणि 9 नोव्हेंबरला सुट्टी घेऊ शकता आणि या 9 दिवसांत तुम्हाला हवी तशी, हव्या तितक्या दिवसांची ट्रीप प्लॅन करू शकता.

तर आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगणार आहोत, जी तुम्ही या नोव्हेंबरमध्ये एंजॉय करू शकता.

भूतान – जर का तुमच्या या ट्रीपला तुम्हाला एक ‘यादगार’ ट्रीप बनवायचे असेल तर भूतान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भूतान हा एक अतिशय सुंदर देश आहे. तसेच आर्थिकदृष्ट्यादेखील भूतान तितकासा महाग नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भूतानला तुम्ही व्हिसाशिवाय भेट देऊ शकता.

सिक्कीम – सिक्कीम हे भारतातील नॉर्थ ईस्टमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या दऱ्या-खोऱ्या, डोंगरदऱ्यात फिरण्याचा आनंद हा काही औरच आहे. प्रदूषण, गर्दी यांपासून दूर सिक्कीम हा एक नक्कीच आगळावेगळा अनुभव ठरू शकतो.

गोवा – भारतातील सर्वात जास्त लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून नेहमीच गोव्याला पसंती दिली जाते. गोव्याचे बीचेस, नाईटलाईफ हे गोव्याचे वैशिष्ठ्य तुम्ही नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत अनभवू शकता.

मेघालय – जर का तुम्हाला हिरवळ, डोंगर, धबधबे, निसर्गाच्या सानिध्यात राहणे आवडत असेल तर, मेघालयसारखी जागा शोधून सापडणार नाही. तसेच सध्याच्या कमर्शिअल जगात आजही मेघालय आपली संस्कृती टिकवून आहे. त्यामुळे तिथल्या ऑथेंटिक गोष्टींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

पंचमढ़ी, मध्य प्रदेश – समुद्रसपाटीपासून 1100 मीटर उंचीवर वसलेले पंचमढी तुमचा रोजच्या जीवनातील सर्व थकवा दूर करेल. जीवनातील समस्यांना थोडे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी ही खूपच सुंदर जागा आहे.

कोलकाता – ‘सिटी ऑफ जॉय’ म्हणून ओळखले जाणारे कलकत्ता आजही त्याचा रुबाब टिकवून दिमाखात पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. भारतीय संग्रहालय, हावडा ब्रिज, दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट, ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियम, बिर्ला इंडस्ट्रियल आणि टेक्नोलॉजीकल संग्रहालय, नंदन अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे. तसेच टिपीकल बंगाली पक्वान्ने, कलात्मक वस्त्रे, गोष्टी अशा अनेक गोष्टी कलकत्त्याच्या पिटाऱ्यात दडलेल्या आहेत.

अंदमान – वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले भारतातील एक महत्वाचे ठिकाण म्हणून अंदमानकडे पहिले जाते. मित्रांसोबत भेट देण्यासाठी अंदमान हा फारच चांगला पर्याय आहे.

हंपी-बदामी – विविध पुरातनकालीन मंदिरे आणि आर्किटेक्चरसाठी लोकप्रिय असलेली ही दोन ठिकाणे युनेस्कोच्या 32 भारतीय जागतिक वारसांच्या यादीत समाविष्ट आहेत. इतर महिन्यात रखरखते ऊन असलेली कर्नाटकमधील ही ठिकाणे नोव्हेंबरच्या थंडीत नक्कीच तुम्हाला एक मेमोरेबल अनुभव देतील.