आता लवकरच बाजारात येणार शाकाहारी अंडे; जाणून घ्या काय असेल वेगळेपण
अंडे - प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

अंडे आधी का कोंबडी आधी? या प्रश्नावर जसे दुमत आहे, वाद आहेत तसेच अंडे हे शाकाहारी आहे का मांसाहारी? यावरही ठोस उत्तर नाही. एक झटपट बनणारा पदार्थ म्हणून आज अंड्याकडे पहिले जाते. अंड्याच्या हजारो रेसिपी आज जगभरात बनवल्या जातात. अंड्यातील प्रोटीन्समुळे स्नायू बळकट करण्यासाठी अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अंड्याचे फायदे माहित असूनही शाकाहारी लोक याकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांच्यामते हा एक मांसाहारी पदार्थ आहे. याच गोष्टीवर उपाय म्हणून आता बाजारात शाकाहारी अंडे येऊ घातले आहे.

अंड्यातील प्रोटीन्सचे असलेले मुबलक प्रमाण, हीच एक गोष्ट लक्षात घेऊन बाजारात शाकाहारी अंडे दाखल झाले आहे. हे लिक्विड एग सब्सिट्यूट पूर्णतः मुगापासून बनवले आहे. म्हणजेच या अंड्यामध्ये मुगातील प्रथिनांचा वापर केला आहे. या प्लांट बेस्ड लिक्विड एग सब्सिट्यूटची अमेरिकेमध्ये खूप चांगली विक्री झाली होती. आता इतर देशांमध्ये ही अंडी लवकरच उपलब्ध होतील. अंड्याबरोबरच प्रोटीन साठी सोयाबीन, दूध, हिरवा वाटाणा, यासारखे अनेक पर्यायही आहेत. यांचा उपयोगही शाकाहारी अंडे बनवण्यासाठी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. (हेही वाचा: अंड्याची कमाल, जगप्रसिद्ध सेलिब्रिटी कायली जेनर हिला मागे टाकत इन्स्टाग्रामवर मिळवले चक्क 2.5 कोटी लाईक्स)

प्लांट बेस्ड फूड्स असोसिएशनच्या कार्यकारी निर्देशिका मिशेल सिमन सांगतात, ‘सध्या लोकांचा चोखंदळपणा थोडा कमी झाला आहे. त्यांना एक चांगला पदार्थ हवा असतो, त्यामुळे ते त्या पदार्थात काय आहे किंवा काय नाही याचा जास्त विचार करत नाहीत. अशावेळी सहज तुम्ही पदार्थ रिप्लेस करू शकता.’  दरम्यान, नुकतेच अमेरिकेतील जस्ट (JUST) या फूड चेन असलेल्या कंपनीने चीनमध्ये आपले पहिले आऊटलेट सुरु केले. ही कंपनी प्रामुख्याने अशा प्रकारच्या शाकाहारी अंड्याचे उत्पादन करत आहे. तर तुम्ही शाकाहारी आहात म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अंडे खात नसाल तर तुमच्यासाठी लवकरच या शाकाहारी अंड्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)