Prediabetes in Teen Girls: ग्रामीण महाराष्ट्रातील जवळपास 39% किशोरवयीन मुली आढळल्या प्री-डायबेटिक; मधुमेहाच्या अभ्यासामधून समोर आली धक्कादायक बाब
Diabetes | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

Prediabetes in Teen Girls: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणार्‍या 16-18 वयोगटातील जवळपास 39% मुलींना पूर्व-मधुमेह (Pre-Diabetic) असल्याची धक्कायक बाब समोर आली आहे. बीकेएल वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज, रत्नागिरीने केलेल्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या 'प्री-डायबेटिस टू डायबेटिस: द ट्रॅजेक्टोरी ऑफ कन्सर्न' (Pre-Diabetes to Diabetes: The Trajectory of Concern) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत या अभ्यासाच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यात आली.

डायबेटोलॉजिस्टच्या मते, 16 ते 18 वयोगटातील 1,520 सहभागींचे सर्वेक्षण केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की 2% किशोरांमध्ये प्री-हायपरटेन्शनचे निदान झाले आणि 12.7% जणांना हाय-डेन्सीटी लिपोप्रोटीन (High-Density Lipoprotein) होते.

मधुमेहतज्ज्ञ डॉ सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, ‘ग्रामीण भागात निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक हस्तक्षेप आणि सर्वांगीण दृष्टिकोनाची गरज आहे, कारण 'प्री-डायबिटीज' ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढलेली असते, परंतु टाइप 2 मधुमेह म्हणून परिभाषित करण्याइतकी जास्त नसते. या अभ्यासात, 39% किशोरवयीन मुलींना प्री-डायबेटिक असल्याचे आढळून आले.’

डॉ. पाटील म्हणाल्या, प्री-मधुमेहाचा जागतिक प्रसार 2021 मध्ये 5.8% (298 दशलक्ष) होता आणि 2045 मध्ये तो 6.5% (414 दशलक्ष) पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आय महाराष्ट्राच्या भावी पिढीला, तरुण लोकसंख्येमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असण्याचा धोका आहे. अशा वाढत्या जीवनशैलीतील आजारांना आळा घालण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे डॉ. पाटील म्हणाल्या. (हेही वाचा: Nanoplastics in Bottled Water: बाटलीबंद पाणी पीत असाल तर व्हा सावध! निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या समस्या, आढळले लाखो प्लास्टिकचे कण)

ICMR-INDAB च्या अलीकडील अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 15.4% शहरी लोकसंख्या आणि 15.2% ग्रामीण लोकसंख्याले प्री-डायबेटीस आहे. लाइफ सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक गोपाल शर्मा म्हणाले की, जीवनशैलीत बदल करून आणि वेळेवर तपासणी करून लोक मधुमेहाचा धोका कायमचा कमी करू शकतात. वैयक्तिक आरोग्य सुधारल्याने मधुमेहाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जागतिक प्रयत्नांना हातभार लागू शकतो.