Men's Lifestyle : पुरुषांनो, चेहरा धुण्यापासून ते प्रायव्हेट पार्ट्सच्या स्वच्छतेपर्यंत अशी घ्या स्वतःची काळजी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

गेल्या कित्येक दशकांपासून भारतावर असलेल्या तीन गोष्टींचा पगडा अजूनही कायम आहे, राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट. 21 व्या शतकात यामध्ये अजून एका गोष्टींची भर पडली ती म्हणजे लाइफस्टाइल. कपडे, बूट-चप्पल, डाएट, जिम, योगा, हेअरस्टाईल, होम डेकोर, उंची अत्तरे, नवनवीन ट्रेंड्स, मेकअप इ. लाइफस्टाइल निगडीत घटकांनी संपूर्ण जनता भारलेली आहे. आपला 'लूक' आपल्या व्यक्तिमत्वाच्या एक अविभाज्य घटक बनला आहे. स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषही स्वतःच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देत आहेत. हातात पैसाही आहे. दिमतीला नामवंत कंपन्यांची ढिगानी उत्पादने आहेत. मात्र हा पैसा नक्की कुठे अणि कसा खर्च करायचा हे माहित असणे गरजेचे आहे. याबाबतीत स्त्रियांसाठी बरीच माहिती उपलब्ध आहे, मात्र पुरुष अणि नटने हे समीकरण रुजायला अजुनही वेळ लागत आहे. ‘ग्रूमिंग’ हा शब्द तर रूढ झाला आहे, मात्र त्यासाठी नक्की कुठून सुरुवात करायची हे पुरुषांच्या अजून लक्षात आले नाही. यासाठीच पुरुषांची लाइफस्टाइल ही सीरिज सुरु करत आहोत. यामध्ये पुरुषांसाठीची त्वचेसंदर्भातील उत्पादने, नविन ट्रेंड्स, कपडे, शूज, हेअरकट अशा सर्व गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अगदी पुरुषांनी आपल्या स्कीनटोननुसार कोणता फेसवॉश वापरायला पाहिजे यापासून ते मान्सून लूक पर्यंतच्या गोष्टी या सिरीजमध्ये वाचायला मिळतील.

आज आपण सुरुवात करणार आहोत ते ‘मॉर्निंग रुटीन’ पासून म्हणजेच सकाळी उठल्यापासून ते घराबाहेर पडेपर्यंतचे रुटीन.

> सकाळी उठल्याबरोबर चेहरा व्यवस्थित फेसवॉशने धुवा. यासाठी आपल्या त्वचेला साजेसा असा फेसवॉश वापरणे गरजेचे आहे.

> त्यानंतर एक ग्लास लिंबू पाणी पिण्याची सवय शरीराला लावा. यामुळे शरीरात साठलेल्या टॉक्झिक गोष्टी बाहेर पडतात.

> त्यानंतर फ्रेश होऊन अंघोळीकडे वळा. अंघोळीसाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा, गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. अंघोळीसाठी शक्यतो लिक्विड सोप वापरा. चेहऱ्याला जर का तुम्ही साबण वापरत असला तर तो वापरणे लगेच बंद करा. चेहऱ्यासाठी नेहमी फेसवॉशचा वापर करा.

> शरीराच्या इतर अवयवांसोबत प्रायव्हेट पार्टसची स्वच्छताही तितकीच महत्वाची आहे. दिवसभर टाईट जीन्स अथवा अंडरवेअर यांमुळे प्रायव्हेट पार्टसच्या जागी घाम जमा होतो, अशा ठिकाणी इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. काही वेळेस अशा जागी खाजही सुटते. यासाठी एक चांगले ‘इंटीमेट वॉश’ (Intimate wash) वापरणे गरजेचे आहे. सध्या भारतीय बाजारात पुरुषांसाठी Skin Elements Men’s Intimate Wash हे प्रायव्हेट पार्टससाठी एक चांगले उत्पादन उपलब्ध आहे. यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका टाळला जाऊ शकतो.

> दररोज शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करणे गरजेचे आहे. फक्त शाम्पू केलात तर केस फारच कोरडे होतात, त्यांना स्मूद करण्यासाठी कंडिशनर वापरणे गरजेचे आहे. फक्त केसच नाही तर दाढीदेखील शाम्पूने स्वच्छ करणे गरजेचे आहे.

> शक्यतो दाढी आणि मिशा दररोज कोरण्याची सवय लावा.

> आंघोळ झाल्यानंतर अंग टॉवेलने खसाखसा न पुसता टॅप करत कोरडे करावे. त्यानंतर लगेच Moisturiser चा वापर करा. यामुळे स्कीन सॉफ्ट राहण्यास मदत होते. त्यांनंंतर आवडता बॉडी स्प्रेचा वापर करा.

> केसांना क्रीम अथवा जेल लावण्याआधी केस पूर्ण कोरडे करून घ्या. लांब केस असतील तर ते सेट करायचा हेअर ड्रायर वापरा.

> यानंतर तुम्ही ड्रेसअप करू शकता. जर तुम्ही शर्ट घालत असाल तर बनियन वापरणे गरजेचे आहे, बनियन शरीरातीत घाम शोषून घेतो, त्यामुळे शर्ट चिकट होत नाही.

> शेवटी आपल्या चेहऱ्याच्या पोत नुसार एखादी Moisturiser युक्त क्रीम चेहऱ्याला लावा. जर दाढी असेल तर, हलक्या हाताने बिअर्ड ऑईल नक्की वापरा. हे झाल्यानंतर लिप बाम लावायला विसरू नका.

> सॉक्स वापरण्याआधी पायाला थोडीशी पावडर लावा. यामुळे बोटांमध्ये होणारे इन्फेक्शन टाळता येऊ शकते. शक्यतो कपड्याला साजेल असे शूज वापरा.

आता तुम्ही बाहेर जाण्यासाठी तयार झाला आहात. या रुटीनमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश आहे. मात्र हे रुटीन कायम ठेवले तर याची सवय होऊन जाईल. ताबडतोब नाही, मात्र लॉंग रनमध्ये या गोष्टींचा फायदा नक्कीच होईल. या सर्वांमध्ये तुम्ही वापरत असलेली उत्पादने फार महत्वाची आहेत. उत्पादने निवडताना नेहमी आपल्या स्कीनला साजेशीच उत्पादने निवडा.