Home (Photo Credits: PixaBay)

आपले घर सजवताना वास्तुशास्त्राप्रमाणे तसं सर्वच दिशांना महत्व आहे. आपली वास्तू बांधण्यापासून ती सजवण्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये दिशा महत्त्वाची असते. या दिशांना महत्व म्हणजे वास्तूमध्ये सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मी नांदावी यासाठी वास्तूत प्रत्येक वस्तूची तसेच स्वयंपाकघर, हॉल, बेडरुम यांसारख्या गोष्टींची जागा निश्चित केलेली असते. या आठ दिशांमध्ये अशुभ मानली जाणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण (South) दिशेबद्दल अनेक लोकांच्या मनात भीती असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण वास्तूशास्त्रामध्ये या दक्षिण दिशा ही 100% अशुभ नाही, असे वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांनी लेटेस्टली मराठीशी बोलताना सांगितले.

दक्षिण ही वाईट आहे हे त्रिवार सत्य आहे, तेवढीच ही दिशा चांगली सुद्धा आहे. ती का आणि कशी हे जाणून घेऊयात वास्तुतज्ज्ञ विशाल डोके (Vishal Doke) यांच्याकडून....

विशाल डोके यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण दिशा म्हणजे द 'क्षिण' याचाच अर्थ हळूहळू क्षीण करणारी दिशा. याचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की ज्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेस आहे ते घर बांधून झाल्यानंतर पुढील 3-4 वर्ष आर्थिक लाभ होतो. मात्र नंतर तोच काळ उताराकडे चालू होतो. पण जर त्या घराचे गृहस्वामी किंवा गृहस्वामिनीने घरातील बेडरुम किंवा मास्टर बेडरूम दक्षिण दिशेस बांधल्यास त्या घरातील फलोत्पन्नती अतिशय चांगली होते. दक्षिण दिशेतील अधोगतीच्या कालखंडातील संकटांना आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो.

हेदेखील वाचा- घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे व का? जाणून घ्या वास्तुतज्ज्ञ विशाल डोके यांच्याकडून

दक्षिण दिशा ही सगळ्यात जड दिशा मानली जाते. जर आपण या दिशेच्या गुणांबाबत किंवा त्यापासून मिळणा-या फायद्याबाबत विचार केला तर दक्षिण दिशा ही अतिशय प्रबळ दिशा आहे. या दिशेमध्ये जडत्व म्हणजेच खंबीर नेतृत्व आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला पाठ करुन बसल्यास यामुळे आपल्याला स्थैर्य मिळू शकते.

दक्षिण दिशेच्या तत्वांविषयी विचार केला असता, अष्टलक्ष्मीपैकी आदिलक्ष्मीचे स्थान दक्षिण दिशेस आहे. आदिलक्ष्मी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. म्हणजेच येथे दुष्ट शक्तींचा नाश करणा-या महाकालीचे वास्तव्य आहे. धनसंपत्तीचे प्रतीक मानल्या जाणा-या महालक्ष्मी चे वास्तव्य आहे. तसेच शैक्षणिक व आध्यत्मिक स्वरूपात शुभ मानल्या जाणा-या महासरस्वतीचे वास्तव्य देखील दक्षिण दिशेस आहे.

त्यामुळे दक्षिण दिशेचा अधिक विचार न करता, न घाबरता आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दक्षिण दिशेस आदिमायेचे स्थान आहे. जे आपल्यासाठी लाभदायकही ठरु शकते.