Winter Food Tips: थंडीत पपईचे अतिसेवन केल्यास होऊ शकतात हे '5' आजार
Papaya (Photo Credits: PixaBay)

थंडी सुरु झाली की जास्तीत जास्त गरम पदार्थ खाण्याकडे आपला कल असतो. गरम पदार्थ म्हणजे निसर्गत: गरम असलेले पदार्थ किंवा फळे जसे की काळी मिरी, हळद, आलं, आंबा इत्यादी. आंबा हे फळ उष्ण जरी असले तरी ते थंडी उपलब्ध होत नाही त्यामुळे आपोआपच आपली पावले वळतात ती पपई कडे. पपई (Papaya) हे सर्वात उष्ण फळ आहे. या फळामुळे शरीरातील तापमान नियंत्रित राहते. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. पपई हे फळ जरी बारमाही उपलब्ध होत असले तरी थंडीत अतिसेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

त्वचा, आतड्यांचे विकार इथपासून ते रक्ताभिसरण आणि पेशींपर्यंत सर्वांसाठी पपई जरी लाभदायक असली तरीही पपई अति खाण्याचे किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यानं त्याचे तोटे होतात.

थंडीत अतिप्रमाणात पपईचे सेवन झाल्यास कोणते आजार उद्भवू शकतात

1) श्वसनाचे विकार:

रक्तदाबाची समस्या असणार्‍यांमध्ये पपईचं अतिसेवन धोकादायक ठरू शकते. रक्तदाबाची औषध घेताना पपईचे सेवन करणं आरोग्याला धोकादायक आहे. यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. श्वसनाचे विकार असलेल्यांनी पपई खाऊ नये त्यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात. अस्थमा, दमा सारख्या आजारांना तुम्ही निमंत्रण देत आहात.

2) त्वचा विकार:

पपईचे सेवन केल्यानं त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. अशावेळी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हेदेखील वाचा- सुकलेली पपई खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

3) मासिक पाळी

पपईचा गुणधर्म उष्ण असतो. अति पपई खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते. नियमित पपईच्या सेवनामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे पपईचं अतिसेवन करणं वेळीच थांबवणं आवश्यक आहे. यासोबतच गरोदरावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे.

4) पोटदुखी, अपचन

पपई पचायला जड असल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणं टाळावं. त्यामुळे करपट ढेकर येणं, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो. काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानं पोटदुखीचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते.

5) हृद्याचे विकार

व्हिटॅमिन सीचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी स्टोन बळावण्याची शक्यतादेखील वाढते. त्यासोबतच डायबेटीसच्या गोळ्यांसोबत पपईचं सेवन केलं अथवा पपई खाल्ल्यानंतर गोळ्या घेतल्यास त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हृदयासंबंधीत आजार असणाऱ्यांनी पपईचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं.

पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे तेवढेच ते खाताना काही गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत तर त्याचे तोटेही आपल्याला होतात.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिला आहे, याला वैद्यकीय सल्ला समजू नये, अशा प्रकारची कृती स्वतः करण्याआधी डॉक्टरांशी संवाद साधा)