Body Fat (Photo Credits: Pixabay)

लठ्ठपणा (Obesity) ही जगातील महत्वाच्या समस्यांपैकी एक समस्या आहे. शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण यासोबत अनेकजण अनेक उपाय करतात. आता लठ्ठपणाशी झगडणाऱ्या लोकांसाठी दिलासादायक बाब आहे. अमेरिकेची सर्वोच्च वैद्यकीय संस्था एफडीएने (FDA) लठ्ठपणा कमी करणारे एक औषध प्रमाणित केले आहे. एफडीएने ज्या औषधाला परवानगी दिली आहे, त्यामुळे लठ्ठपणा साधारण 15 टक्क्यांनी कमी होतो. वेगोवी (Wegovy) असे या औषधाचे नाव आहे. हे नोव्हो नॉर्डिस्क (Novo Nordisk) या औषधी कंपनीने बनवले आहे.

जरी हे मधुमेहासाठीचे औषध असले तरी, अमेरिकेत ते आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरले जाणार आहे. हे औषध वजन कमी करण्याच्या औषधाच्या नावाखाली बाजारात आणण्यात येणार आहे. वेगोवी हे नोव्हो नॉर्डिस्कचे मधुमेह औषध सेमाग्लूटाइड (Semaglutide) चे अपग्रेटेड व्हर्जन आहे. या औषधामध्ये दीर्घकाळासाठी वजन कमी ठेवण्याची क्षमता आहे.

ज्या लोकांनी नोवो नॉर्डिस्कच्या या औषधाच्या चाचणीत भाग घेतला त्या सर्व लठ्ठ लोकांचे वजन सरासरी 15 टक्के कमी झाली. म्हणजेच सरासरी 15.3 किलो वजन कमी झाले. वेगोविची चाचणी 14 महिन्यांहून अधिक काळ चालली होती. 14 महिने या लोकांचे वजन कमी होत राहिले, त्यानंतर एका पातळीवर येऊन ते थांबले.

लठ्ठपणा हा अमेरिकेतील सर्वात महत्वाचा आरोग्याचा मुद्दा आहे. लठ्ठपणामुळे कर्करोग, कोरोनरी आर्टरी डिसीज, टाइप 2 मधुमेह, स्ट्रोक, लवकर मृत्यू अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच ही गोष्ट लोकांच्या मोठ्या आर्थिक खर्चाशीही निगडीत आहे. अभ्यासामध्ये दिसून आले आहे की, शरीराचे वजन 5% ते 10% पर्यंत कमी केल्यास लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या प्रौढांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. (हेही वाचा: Health Benefits Of Nutmeg: मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'जायफळ' चे आहेत बरेच औषधी गुण' जाणून फायदे)

याबाबत डॉ. हॅरोल्ड म्हणाले की, वेगोवी औषध हे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या इतर लठ्ठपणा कमी करणार्‍या औषधांपेक्षा सुरक्षित आहे. या औषधामुळे अस्वस्थता, अतिसार, डोकेदुखी आणि उलट्या यासारखे लहान साइड इफेक्ट्स उद्भवू शकतात, पण ते काही दिवसात बरे होतील. डॉ. हॅरोल्ड यांनी पुढे सांगितले की, या औषधाची एकमात्र मोठी समस्या म्हणजे थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी ते वापरता येणार नाही. वेगोवी हे मेंदूच्या भागाला लक्ष्य करते ज्याद्वारे तुमची भूक नियंत्रित केली जाते. तसेच यामुळे रुग्णांना निरोगी वाटते आणि व्यायामासाठी प्रेरणा मिळू शकते.