भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाने दाहक रुप धारण केले आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांची वाढता संख्या चिंताजनक तर आहेच. पण या जागतिक आरोग्य संकटासोबतच इतर अनेक समस्या, प्रश्न देखील जगासमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) वर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात जगभरातील अनेक देश आहेत. त्याचबरोबर कोविड-19 संबंधित इतर संशोधनंही जगभरात सुरु आहेत. अशातच चष्मा घालणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचा खुलासा एका संशोधकांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात अधिक संशोधनाची गरज असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग डोळ्यातूनही होऊ शकतो, असे संशोधनातून पुढे आले आहे. चीनच्या सुइझोउ प्रातांत झालेल्या रिसर्च मधून ही माहिती समोर आली आहे. या रिसर्च मध्ये 276 रुग्ण सहभागी झाले होते. दरम्यान, या संदर्भात इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (COVID-19 Nasal Spray Vaccine: चीन ने जगातील पहिल्या कोरोना नेजल स्प्रे वॅक्सिन च्या ट्रायलसाठी दिली परवानगी)
सध्या असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीनुसार, सुमारे 12% रुग्णांना डोळ्यांच्या माध्यमातून संसर्ग झाल्याचे समजतंय. तसंच या रुग्णांच्या अश्रूंमध्येही कोरोना व्हायरस असल्याचे निर्दशनास आले आहे. या माहितीला खुद्द नेत्रतज्ञांनी दुजोरा दिला आहे. चीनमधील नांचांग विद्यापीठाच्या Second Affiliated Hospital संशोधकांनी असा अंदाज लावला आहे की दररोज आठ तासांपेक्षा जास्त काळ चष्मा घातल्याने कोरोना व्हायरस संसर्गापासून संरक्षण होते. कारण डोळ्यांवर चष्मा असल्यास डोळ्यांना हात लावण्याची क्रिया कमी होते.
दरम्यान, देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत 90 हजारहून अधिक रुग्णांची मोठी भर दिवसागणित पडत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या आहे. परंतु, दिवसाला पडणारी मोठी भर चिंता वाढवत आहे. सध्या देशात 52,14,678 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 10,17,754 सक्रीय रुग्ण आहेत. तर 41,12,552 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 1,174 मृतांची नोंद झाली आहे.