कोरोना व्हायरस (coronavirus) संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व जगातील अनेक देश यावर अजूनही लस अथवा औषध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशात या आजाराचे स्वरूप, मृत्यूचे प्रमाण आणि वेगवेगळ्या लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो यावर एकाच वेळी अनेक ठिकाणी संशोधन चालू आहे. आता एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, पुरुष अंडकोषांमुळे (Testicles) त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण जास्त असते. न्यूयॉर्कमधील ऑन्कोलॉजिस्ट आणि तिची सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आई यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमधील (Kasturba Hospital) संशोधकांच्या गटाने हे संशोधन केले आहे.
या संशोधकांनी मुंबईत राहणारे 48 पुरुष आणि 20 स्त्रियांचा अभ्यास केला होता. ज्यामध्ये त्यांना आढळले की, पुरुषांच्या अंडकोषात प्रथिने असल्यामुळे पुरुषास या आजारातून बरे होण्यासाठी जास्त काळ लागतो. हा अभ्यास MedRxix वर पोस्ट केला गेला आहे. ब्रॉन्क्समधील माँटेफिअर मेडिकल सेंटरची ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अदिती शास्त्री आणि तिची आई जयंती शास्त्री, ज्या मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांसाठी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, त्यांनी हा अभ्यास केला. त्यांच्या शोधानुसार, हे विषाणू अंडकोषात उच्च पातळीवर उद्भवणार्या अँजिओटेन्सीन (Angiotensin) नावाच्या प्रोटीनशी संबंधित आहेत.
हे प्रथिने फुफ्फुस, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि हृदयात असते, परंतु अंडकोषात ते मोठ्या प्रमाणात असते. अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, हा व्हायरस शरीराच्या इतर भागापेक्षा त्या ठिकाणी जास्त काळ राहू शकतो. हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची तपासणी केली. संसर्ग झाल्यापासून, त्यांच्या आजाराची गती तपासण्यासाठी त्यांनी दर दोन दिवसांनी त्यांच्या संक्रमित कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली. यामध्ये त्यांना आढळले की 20 महिला रूग्णांमध्ये व्हायरल क्लीयरन्सचा चार दिवसांचा वेळ होता, परंतु 48 पुरुषांमध्ये ते प्रमाण 50% जास्त होते. (हेही वाचा: COVID-19: पादाच्या हवेतून कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ शकतो का? जाणून घ्या बेजिंग येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राचा अहवाल)
याबाबत लिहिले आहे की, 'या निरीक्षणावरून असे दिसून येते की पुरुषांमध्ये व्हायरल क्लीयरन्सला उशीर झाला आहे. अंडकोष हे व्हायरससाठी आश्रयस्थान असू शकते.' परंतु काही तज्ञांनी या निष्कर्षांवर शंका व्यक्त केली आहे. University of Reading मधील विषाणूचे प्राध्यापक इयान जोन्स यांनी डेली मेलला सांगितले की, 'सामान्यत: पुरुषांचे इम्यूनोलॉजिकल रिझल्ट हे महिलांपेक्षा वाईट ठरतात. शक्यतो हा केवळ एका एक्स क्रोमोसोमचा (X Chromosome) परिणाम आहे.' जर या विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या पहिली तर, चीन, दक्षिण कोरिया, इटली आणि अमेरिकेतल्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.