Lok Sabha Cancer Data: कर्करोग हा एक असा आजार आहे, जो अतिशय घातक आहे. जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कर्करोग होतो तेव्हा केवळ पीडित व्यक्तीलाच त्रास होत नाही, तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही या आजारामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास होतो. कर्करोग हा मुद्दा इतका घातक आहे की, यासंदर्भात सरकारला लोकसभेत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या प्रश्नांची उत्तर दिली आहेत.
भारतातील कर्करोग्रस्त रुग्णांची संख्या -
लोकसभेत कर्करोगग्रस्तांच्या अधिकृत संख्येवर उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री प्रोग्राम म्हणजेच ICMR-NCRP चा हवाला देत सांगितले की, 2022 मध्ये देशात कर्करोगाच्या एकूण रुग्णांची संख्या 1461427 होती. तर 2021 मध्ये ते 1426447 होते. याशिवाय 2020 मध्ये ही संख्या 1392179 होती. (हेही वाचा - ABHA Health Card: राज्यातील सर्व नागरिकांसाठी 'आभा' हेल्थ कार्ड आवश्यक; जाणून घ्या फायदे व कुठे काढाल)
उत्तर प्रदेशात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण?
कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात आहेत. येथे 2020 मध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 201319 होती, तर 2021 मध्ये ही संख्या 206088 होती आणि 2022 मध्ये यूपीमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची संख्या 210958 होती. त्याच वेळी, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये कर्करोगाच्या रुग्णांची सर्वात कमी संख्या आहे. 2020 मध्ये येथील रुग्णांची संख्या 27 होती, 2021 मध्ये ही संख्या 28 वर गेली आणि 2022 मध्ये ही संख्या वाढली नसून ती 28 वर राहिली.
कर्करोगामुळे गेल्या 3 वर्षांत 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू -
लोकसभेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी जारी केलेल्या अहवालानुसार, संपूर्ण भारतात 2020 मध्ये कर्करोगाने मरण पावलेल्या लोकांची संख्या 7,70,230 होती. तर 2021 मध्ये ही संख्या 7,89,202 होती. 2022 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी भारतात कर्करोगाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली असून ती 8,08,558 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, राज्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये कॅन्सरमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 2020 मध्ये कर्करोगाने मरण पावलेल्या लोकांची संख्या 111491 होती. तर 2021 मध्ये ही संख्या 114128 पर्यंत वाढली. त्याच वेळी, 2022 मध्ये, यूपीमध्ये कर्करोगाने मरण पावलेल्या लोकांची संख्या 116818 झाली आहे. म्हणजेच दरवर्षी त्यात वाढ झाली आहे.
कर्करोगग्रस्त बालकांच्या स्थितीवर लोकसभेत उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सांगितले की ICMR-NCRP च्या अहवालानुसार, 2022 मध्ये, 0 ते 14 वर्षे वयोगटातील एकूण 35,017 मुले कर्करोगाचे बळी ठरली होती.