Protein Supplements Mislabeled In India: सावध रहा! भारतात उपलब्ध असलेल्या 70 टक्के प्रोटीन सप्लिमेंट्सचे लेबल चुकीचे; सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक सत्य
प्रातिनिधिक प्रतिमा )Photo Credit : Pixabay)

Protein Supplements Mislabeled In India: कोरोनानंतर लोकांचा फिटनेसकडील कल वाढला. आजकाल अगदी तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत. यामुळे मार्केटमध्ये प्रोटीन पावडरचीदेखील (Protein Powder) चलती आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी, आपण अनेकदा दूध किंवा इतर पेयांमध्ये काही पोषक सप्लिमेंट्स घालतो, जेणेकरून शरीराला अधिक ऊर्जा आणि पोषक तत्वे मिळतील. तुम्हीही असे करत असाल किंवा बाजारात उपलब्ध असलेली प्रोटीन पावडर घेत असाल, तर सावध रहा. कारण भारतात विकल्या जाणाऱ्या 70 टक्के प्रोटीन सप्लिमेंट्सचे लेबल चुकीचे असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

महत्वाचे म्हणजे अशा सप्लिमेंटमध्येही विषारी पदार्थ आढळून आल्याचे अभ्यास अहवालात समोर आले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या 36 प्रोटीन पावडरचे परीक्षण करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या विश्लेषणात असे दिसून आले की, 36 सप्लिमेंट्सपैकी सुमारे 70 टक्के सप्लिमेंट्सवर प्रोटीनशी संबंधित माहिती चुकीची होती. अशाप्रकारे भारतात लोकप्रिय असलेल्या प्रोटीन पावडरबद्दल एका नवीन अभ्यासातून एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.

यामध्ये असेही समोर आले आहे की, काही ब्रँड त्यांच्या दाव्यांपैकी केवळ 50 टक्के दावे पूर्ण करू शकतात. सुमारे 14 टक्के नमुन्यांमध्ये हानिकारक फंगल अफलाटॉक्सिन असल्याचेही आढळून आले. याशिवाय 8 टक्के सप्लिमेंट्समध्ये कीटकनाशके आढळून आली, जी धोकादायक असल्याचेही समोर आले आहे. केरळमधील राजगिरी हॉस्पिटलशी संलग्न एक क्लिनिकल संशोधक आणि अमेरिकेतील एका तंत्रज्ञान उद्योजकाने भारतीय उत्पादित हर्बल प्रोटीनवर आधारित सप्लिमेंट्सपैकी बहुतांश निकृष्ट दर्जाचे असल्याचे वर्णन केले आहे. (हेही वाचा: Protein Shake: प्रोटीन शेक प्यायल्याने 16 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाचा मृत्यू; यूकेच्या अधिकाऱ्याचे पॅकेजिंगवर 'इशारा' देण्याचे आवाहन)

विषारी वनस्पतींपासून ते तयार करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, या निष्कर्षांमुळे भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध असलेल्या प्रथिने पावडरच्या गुणवत्तेबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराचा भाग म्हणून प्रोटीन पावडरचा विचार करत असल्यास, सावधगिरीने पुढे जा. डॉक्टरांच्यामते प्रोटीन पावडर, शिसे, कॅडमियम आणि पारा यांसारख्या जड धातूंसारख्या विषारी पदार्थांनी दूषित झाल्यास, आपल्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण होऊ शकतो.