New Task Force in Maharashtra: कोरोना विषाणूच्या JN.1 या प्रकाराच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्र सरकारकडून नवीन टास्क फोर्सची स्थापना
COVID 19 | Twitter

Task Force in Maharashtra: कोविड-19च्या (Covid-19) पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स- Task Force) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-19 रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-19 क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली. (हेही वाचा: JN.1 COVID variant cases in India: भारतात नव्या कोविड व्हेरिएंट चे 69 रूग्ण; सर्वाधिक कर्नाटकात)

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी कोविड-19 चे 37 नवे रुग्ण आढळले. यासह राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 194 वर पोहोचली. राज्यात कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोविडचा नवा व्हेरिएंट जेएन 1 संपर्कात आलेल्या कोणताही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात जेएन1 प्रकाराचे 9 रुग्ण आहेत.