New Coronavirus: चिंताजनक! आता कुत्र्यांपासून मानवांमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याची शक्यता; शास्त्रज्ञांना सापडला नवीन विषाणू
Street Dogs Representative Image (Photo Credits-Facebook)

2019 मध्ये कोविड-19 ची (Coronavirus) पहिली घटना उघडकीस आली होती. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा विषाणू बॅटपासून मनुष्यांपर्यंत पसरला आहे, तर काही लोक असा आरोप करत आहेत की हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतून लीक झाला आहे. मात्र अजूनतरी कोणत्याही दाव्याची पुष्टी झालेली नाही. आता दुसऱ्या एका संशोधनात असा दावा केला गेला आहे की, न्यूमोनिया झालेल्या काही रुग्णांमध्ये कुत्र्यांमधील कोरोना व्हायरस सापडल्याची पुष्टी झाली आहे. जर या संशोधनाच्या दाव्यांची पुष्टी झाली तर प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेला हा आठवा कोरोना व्हायरस असेल.

हा विषाणू प्रथम 2018 मध्ये पाहिला गेला होता. तो प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत पोहोचलेला आठवा कोरोना विषाणू असल्याचे म्हटले जात आहे. हा किती धोकादायक आहे हे अद्याप समजू शकलेले नाही, परंतु यामुळे महामारीची कोणतीही भीती नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यापूर्वी या विषाणूच्या कुटूंबातील सात व्हायरस मानवांमध्ये आढळले आहेत. यापैकी चार विषाणूंमुळे सामान्य सर्दी व थंडी अशा समस्या दिसून येतात, तर इतर तिघांनी SARS, MERS आणि COVID सारखे गंभीर आजार पसरवले.

'क्लिनिकल इन्फेक्टीव्ह डिसिसीज' नावाच्या जर्नलने गुरुवारी एक संशोधन अहवाल प्रकाशित केला. अहवालातील संशोधकांनी सांगितले की, मलेशियामध्ये निमोनियाच्या 301 रुग्णांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यापैकी आठ जणांमध्ये ‘कॅनाईन कोरोना विषाणू’ (Canine Coronavirus) ची पुष्टी झाली. कॅनाईन कोरोना विषाणू कुत्र्यांमध्ये आढळतो. ज्या रुग्णांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे त्यामध्ये बहुतेक पाच पेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश आहे. रूग्णांकडून घेतलेल्या नमुन्यांच्या जीनोम सीक्वेंसिंगमध्ये CCoV-HuPn-2018 हा स्ट्रेन आढळला आहे. (हेही वाचा: Vaccine Tourism in Russia: 1.30 लाखात रशियाची 24 दिवसांची ट्रीप आणि Sputnik V चे दोन डोस; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे पॅकेज सुरू)

मात्र अजूनतरी हा विषाणू कुत्र्यांपासून मानवांमध्ये पसरला आहे का? किंवा मानवांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे का? याबाबत काही ठोस माहिती समोर आली नाही.