Mauritius Jan Aushadi Kendra

Mauritius Jan Aushadi Kendra: भारतीय जनऔषधी केंद्र प्रकल्पाने (Jan Aushadi Kendra) केवळ भारतातच नव्हे तर आता परदेशातही आपली छाप पडण्यास सुरुवात केली आहे. देशभरातील रुग्णांना स्वस्त दरात जेनेरिक औषधे पुरवणाऱ्या भारतीय जनऔषधी केंद्राचा विस्तार आता मॉरिशसमध्ये (Mauritius) करण्यात आला आहे. याअंतर्गत मॉरिशसमध्ये पहिले भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले असून, ते तेथील लोकांना कमी किमतीत जीवनरक्षक औषधे उपलब्ध करून देणार आहे. पंतप्रधान मोदींनी हे केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मॉरिशसमध्ये पहिल्या विदेशी जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले.

जयशंकर 16 ते 17 जुलै या दोन दिवसांच्या दौऱ्यावर मॉरिशसमध्ये होते. यादरम्यान, स्वस्त औषधे असलेले हे जनऔषधी केंद्र मॉरिशसच्या लोकांना समर्पित करण्यात आले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ हेही उद्घाटनाला उपस्थित होते.

मॉरिशसमधील पहिल्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन हे, ‘दोन्ही देशांमधील, विशेषत: आरोग्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रात घनिष्ठ सहकार्य,’ असल्याचा पुरावा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी मॉरिशसच्या ग्रँड बोआ परिसरात भारताच्या आर्थिक सहाय्याने बांधलेल्या मेडिक्लिनिक प्रकल्पाचे उद्घाटनही केले. मेडिक्लिनिक सुरू झाल्याने ग्रँड बोआ परिसरातील 16 हजार लोकांना तज्ज्ञ उपचार सेवा मिळणार आहेत, (हेही वाचा: Lung Disease Due To Pigeons: कबूतरांच्या सतत संपर्कात राहिल्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा गंभीर आजार; दिल्ली रुग्णालयाच्या अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती)

पहा पोस्ट-

सर्वांना परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आश्वासनानुसार हे औषध केंद्र सुरू करण्यात आले आहे. ‘भारत-मॉरिशस आरोग्य भागीदारी प्रकल्पांतर्गत मॉरिशसमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी परवडणारी, भारतात बनवलेल्या औषधांचा पुरवठा केला जाईल.’