प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

सर्वसामान्यपणे नको असलेली गर्भधारणा (Unwanted regnancy) टाळण्यासाठी स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive Pill) घेतात, परंतु आता लवकरच बाजारात पुरुषांसाठीदेखील गर्भनिरोधक गोळी येण्याची शक्यता आहे. नुकतेच अमेरिकन सरकारच्या निधीतून करण्यात आलेल्या एका संशोधनात पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीबाबत ही बाब समोर आली आहे. संशोधकांच्या मते, पुरुष गर्भनिरोधक गोळ्या गेम चेंजर ठरू शकतात.

डेली मेलच्या वृत्तानुसार, पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवर संशोधन करण्यात आले आहे आणि सेक्सच्या 30 मिनिटे आधी या गोळीचे सेवन केल्यास किमान दोन तास गर्भधारणा टाळता येणे शल्या आहे.

या अभ्यासाशी संबंधित सर्व माहिती 14 फेब्रुवारी रोजी जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. याबाबत बोलताना, वेल कॉर्नेल मेडिसिन येथील फार्माकोलॉजीचे प्राध्यापक सह-वरिष्ठ लेखक डॉ. जोचेन बक आणि डॉ. लोनी लेविन म्हणतात की, हा शोध गेम चेंजर आहे. डॉ. बक सांगतात की, गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांसमोर दोनच पर्याय आहेत, एकतर दोन हजार वर्षांपासून चालत आलेला प्रकार म्हणजे पुरुष कंडोम वापरणे किंवा दुसरा म्हणजे नसबंदी करून घेणे. परंतु पुरुषांसाठी गर्भनिरोधकांवरील संशोधन कधीच थांबले नाही. आता लवकरच बाजारात पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी उपलब्ध होऊ शकेल.

हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला आहे, ज्यामध्ये उंदरांना TDI-11861 नावाच्या SAC इनहिबिटरचा एक डोस देण्यात आला. या एका डोसमुळे उंदरांचे शुक्राणू अडीच तास स्थिर राहिले आणि त्याचा हा परिणाम सेक्सनंतर स्त्रीच्या प्रजनन मार्गावरही कायम राहतो. अभ्यासात पुढे असे आढळून आले की, काही शुक्राणूंची गती सुमारे तीन तासांनंतर पुन्हा सुरू होते व साधारण 24 तासांनंतर जवळजवळ सर्व शुक्राणूंची सामान्य हालचाल पुन्हा सुरु होते. (हेही वाचा: भारतातील 81 टक्के महिलांना 'अविवाहित राहणे' वाटते जास्त सुखकारक; देशातील विवाहासंस्थेबद्दल समोर आला धक्कादायक अहवाल)

अभ्यासात असेही दिसून आले आहे की या डोसनंतर अनेकवेळा सेक्स होऊनही मादी उंदीर गर्भवती असल्याचे आढळून आलेले नाही. ही गोळी पुरुषांच्या शुक्राणूंना मादीच्या अंड्यांकडे पोहण्यापासून रोखते किंवा अंडी फलित करणाऱ्या आणि मूल जन्माला घालण्यास सक्षम असलेल्या अवस्थेपर्यंत परिपक्व होण्यापासून रोखते. संशोधकांनी ही गोळी 100 टक्के प्रभावी मानली आहे.

अमेरिकन मेडिकल एजन्सी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ने हे संशोधन केले आहे. अभ्यासानुसार, पहिल्या दोन तासांत ही गर्भनिरोधक गोळी 100 टक्के प्रभावी होती. तीन तासांत तिचा प्रभाव 91 टक्के आढळून आला. साधारण 24 तासानंतर या औषधाचा प्रभाव संपेल. या गोळीचा उंदरांवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही, असेही अहवालात म्हटले आहे.