कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी BCG Vaccine वृद्धांसाठी फायदेशीर ठरेल; ICMR च्या अभ्यासातून खुलासा
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

मुळात क्षयरोगासाठी (Tuberculosis) विकसित केलेले Bacille Calmette-Guerin किंवा BCG लस कोविड-19 (Covid-19) वर देखील फायदेशीर ठरत आहे. विशेषत: वृद्धांना याचा अधिक फायदा होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research) अभ्यासातून समोर आले आहे. बीसीजी लसीमुळे (BCG Vaccine) रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून त्यामुळे अनेक इंफेक्शन्सपासून संरक्षण होते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. (Covid-19 Vaccine Availability: कोविड-19 वरील कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार? SII चे CEO अदार पूनावाला यांनी दिले 'हे' उत्तर)

"आम्ही बीसीजी लसीचे T cell, B cell, monocyte आणि dendritic cell वर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. तसंच कोविड-19 वरील या लसीचे परिणाम तपासण्यासाठी क्लिनिकल अभ्यासाचा भाग म्हणून एका महिन्याच्या लसीकरणानंतर निरोगी वृद्ध व्यक्तींच्या (वय 60-80 वर्षे) एकूण अँटीबॉडीजची पातळीही तपासण्यात आली," असे आयसीएमआरच्या (ICMR) संशोधकांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे.

बीसीजी लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून कोरोना व्हायरस विरुद्ध ते फायदेशीर ठरु शकते. असे या अभ्यासाच्या निकालाअंती समोर आले आहे. बीसीजी लसीमुळे antibody isotype च्या पातळीत वाढ झाल्याचे संशोधकांनी अभ्यासात म्हटले आहे. तसंच बीसीजी लसीमुळे वृद्ध व्यक्तींमध्ये adaptive memory cell subsets आणि अँटीबॉडीजमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस, मोठ्या प्रमाणावरील जागतिक चाचणीचा एक भाग म्हणून, ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी सर्वत्र वापरल्या जाणार्‍या बीसीजी लस कोविड-19 विरूद्ध लोकांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते का, याची तपासणी करण्यासाठी एक अभ्यास सुरू केला होता. दरम्यान, बीसीजी लस रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करत असल्याने कोविड-19 विरुद्ध प्रभावी आहे, असे 'सेल रिपोर्ट्स मेडिसिन' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातही म्हटले आहे.