Healthify Layoff: हेल्थटेक स्टार्टअप हेल्दीफाईमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकर कपात; 30 टक्के लोकांना कामावरून काढून टाकले
Layoffs (PC- Pixabay)

Healthify Layoff: आजकाल अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. आता या टाळेबंदीमध्ये आणखी एका कंपनीच्या नावाचा समावेश झाला आहे. बेंगळुरू स्थित हेल्थटेक स्टार्टअप हेल्दीफाईने (Healthify) पुनर्रचना प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपले 30 टक्के म्हणजेच सुमारे 150 कर्मचारी काढून टाकले आहेत. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली. Inc42 ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, विक्री आणि उत्पादन संघातील कर्मचारी या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या नोकऱ्या कपातीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

हेल्दीफाईचे सह-संस्थापक आणि सीईओ तुषार वशिष्ठ यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, ‘पुढील तीन-चार महिन्यांत आमचा भारतीय व्यवसाय करपूर्व नफ्यात असेल. ही पुनर्रचना दुर्दैवी आहे, परंतु नफा साध्य करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक विस्तारासाठी आपल्याकडे पुरेशा संसाधनांचे पर्याय असणे याचीही खात्री करणे आवश्यक आहे.’

याव्यतिरिक्त, स्टार्टअपने सांगितले की, ते या काळात प्रभावित कर्मचाऱ्यांना मदत करतील. ज्यामध्ये सर्वसमावेशक पॅकेज, विस्तारित विमा संरक्षण आणि नोकरी प्लेसमेंट सहाय्य अशा काही गोष्टी समाविष्ट आहेत. वृत्तानुसार, नोकर कपात झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा पगार, वाढीव विमा संरक्षण आणि सुट्टीच्या बदल्यात रोख रक्कम देण्याची ऑफर देण्यात आली आहे. (हेही वाचा: US Rejected MDH Exports: अमेरिकेने ऑक्टोबर 2023 पासून नाकारल्या एमडीएचने निर्यात केलेल्या 31 टक्के शिपमेंट्स; समोर आले 'हे' कारण)

दरम्यान, याआधी या हेल्थटेक स्टार्टअपने 2021 मध्ये आपल्या विविध संघांमधून सुमारे 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. सध्या हेल्दीफाईमी ॲप आरोग्य आणि फिटनेस, आहारातील सवयी, वजन इ. यांचा मागोवा घेण्यासाठी तसेच कोचिंग सेवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरते. कंपनीची स्थापना 2012 मध्ये झाली होती व कंपनीने आतापर्यंत सुमारे $130 दशलक्ष निधी उभारला आहे.