
Benefits Of Tulsi Leaves: तुळशीच्या झाडाचे (Basil Leaves) धार्मिक महत्व आपण सारे जाणून आहोत. मात्र हे गुणकारी झाड आयुर्वेदिक आणि औषधी देखील आहे हे आपण जाणता का? तुळशीच्या पानामुळे हवा शुद्ध राहण्यास मदत होते, त्यामुळे प्रत्येक घराच्या दारात पूर्वीपासून तुळशी वृंदावन आवर्जून बांधले जायचे. दररोज सकाळी तुळशी वृंदावनाची पूजा करून मगच पुढे दिवसाची सुरुवात व्हायची. यासोबचत तुळशीच्या पानात असणारे काही गुणकारी सत्व हे शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. पार पूर्वीपासून अनेक घरात तुळशीची पाने खाणे हा विविध आजारांवरील रामबाण उपाय मानला जातो. तोंडाला येणारी दुर्गंधी मिटवण्यापासून ते त्वचेची काळजी घेण्यापर्यंत तसेच सर्दी खोकल्याच्या शुल्लक विकारांपासून ते दुर्धर आजारांपर्यंत अनेक कामे ही तुळशीची पाने अगदी सहज करतात. आज आपण असेच काही तुळशीच्या पानांचे फायदे जाणून घेणार आहोत.
स्कीन चे Deep Cleansing
तुळशीतील अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते. तुळशीची पानं आणि पाणी यांची वाटून चांगली पेस्ट तयार करा. या पानांची पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा मिनीटांनी चेहऱ्या स्वच्छ धुवून टाका. चेहऱ्यावर पिंपल्सचा त्रास जाणवत असेल तर त्यापासून शुद्ध तुळशीची ही पेस्ट मुक्त करू शकते. शिवाय चेहऱ्यावर सुरकुत्या, एजिंग ची चिन्हे हटवण्यात सुद्धा या पेस्ट चा उपयोग होतो. आपण रोज तुळशीची पाने उकळून पाणी प्यायल्यास त्वचा डिटॉक्स होते. मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यात किचन मधील हे जिन्नस करतील मदत; जाणून घ्या झटपट घरगुती उपाय
केसांच्या वाढीत होते मदत
तुळशीच्या पानांचा आणि लिंबाचा थेंब भर रस घेऊन हेअर मास्क बनवता येईल. हा रस केसांच्या मुळांना लावा आणि वीस ते तीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य नक्कीच चांगले होऊ शकते. तेलात थोडी तुळस टाकून केसाला लावल्यास कोंडा आणि ड्राय स्कॅल्प च्या समस्या दूर होतात.
तोंडाची दुर्गंधी दूर होते
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पाने पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. दररोज सकाळी उठल्यावर तुळशीची पाने चघळल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
पिरियेडच्या चिंतेतून सुटका
अनियमित किंवा उशिरा येणाऱ्या पिरियड्सची समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या बियांचे सेवन केल्यास फायदा होतो. यामुळे मासिक पाळीतील अनियमितता दूर होते. तुळशीचे पाणी ही नियमित घेतल्यास रक्ताची गुणवत्ता सुधारते.
पोटाच्या विकारांवर गुणकारी
पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर होतो. तुळशीची पाने आणि बिया पोटाच्या अल्सरवर गुणकारी आहेत. तसेच याच्या सेवनाने मूत्रविसर्जन सुलभ होते आणि किडनी स्वच्छ राहण्यास मदत होते.
धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपले स्वास्थ्य आणि आहार याकडे आपले दुर्लक्ष होते, अशावेळी एखादी चांगली सवय लावून घेतल्यास तब्येत संतुलित ठेवण्यास मदत होते.या चांगल्या सवयीची सुरुवात आजपासूनच करा तुमच्या घराबाहेर एक तरी तुळशीचे रोपटे लावा आणि त्याच्या या नानाविध गुणांचा लाभ घ्या.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)