COVID-19 Immunity: 8 महिने राहते कोरोना विषाणूविरुद्धची प्रतिकारशक्ती; अभ्यासातून खुलासा, लसीकरण बराच काळ प्रभावी ठरण्याची आशा
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) साथीने हाहाकार माजवला आहे. अशात कोरोनाविरूद्धच्या प्रतिकारशक्तीबाबत (COVID-19 Immunity) बरीच चर्चा सुरु आहे. एका नवीन अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे की कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर कमीतकमी 8 महिने या रोगाच्या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती राहते. नवीन संशोधनानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेले लोक कमीतकमी आठ महिने या रोगाचा संसर्ग रोखू शकतात असे दिसून आले आहे. या अभ्यासामुळे, कोविड-19 विरुद्धची लस बराच काळ प्रभावी ठरेल या अपेक्षेला बळकटी मिळाली आहे. जर्नल सायन्स इम्यूनोलॉजी (Journal Science Immunology) मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

कोरोनाविरूद्धच्या प्रतिकारशक्तीबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वांनाच उत्सुकता आहे की, कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती किती काळ कायम राहते? पूर्वीच्या अभ्यासानुसार असा दावा केला गेला होता की कोरोनाविरूद्धची प्रतिपिंडे संक्रमणानंतर पहिल्या काही महिन्यांतच संपून जातात. परंतु आता नवीन संशोधनात असा दावा केला जात आहे की, कोरोना विरूद्ध कमीतकमी आठ महिने रोगप्रतिकारकशक्ती राहू शकते.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या (Monash University) शास्त्रज्ञांसह वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, रोगप्रतिकारक प्रणालीत विशिष्ट पेशी असतात, ज्यांना मेमरी बी पेशी म्हणतात. या पेशी विषाणूमुळे झालेल्या संक्रमणाची आठवण ठेवतात. शास्त्रज्ञांच्या मते, जर का हा विषाणू शरीरामध्ये पुन्हा आढळला तर या पेशी वेगाने उत्पादनाद्वारे संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती निर्माण करतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या निष्कर्षांमुळे विषाणूविरूद्ध कोणत्याही लसीच्या कार्यक्षमतेची आशा आहे आणि जगभरात कोट्यावधी लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण का कमी आहे यावरही प्रकाश टाकला गेला आहे. (हेही वाचा: युकेमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेनचा भारताला धोका? जाणून घ्या काय म्हणाले आरोग्य मंत्रालय)

मोनाश युनिव्हर्सिटीच्या इम्यूनोलॉजी विभागाचे सह-लेखक मेनो व्हॅन झेलम म्हणाले की, ‘हे निकाल महत्त्वाचे आहेत कारण ते निश्चितपणे दर्शवितात की कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण या व्हायरसशी लढण्यासाठी जास्त काळापर्यंत प्रतिकारशक्ती निर्माण करतात.