प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : pixabay)

जगभरातील लाखो लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने (Coffee) करतात. अनेकांचे हे सकाळचे सर्वात आवडते पेय आहे. मात्र बरेच लोक सकाळ ऐवजी दुपारी किंवा संध्याकाळी कॉफी पिणे पसंत करतात. परंतु, सकाळी कॉफी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य (Heart Health) सुधारते, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. कॉफी हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते आणि ती पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ.

हे संशोधन युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. सकाळी कॉफी पिणाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी असल्याचेही आढळून आले आहे. अमेरिकेतील टुलेन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात दावा केला आहे की, जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी कमी होतो आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 31 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

मात्र कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत दिवसभर कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका कमी झालेला नाही. या अभ्यासात, संशोधकांनी 1999 ते 2018 दरम्यान 40725 प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले. संशोधकांच्या मते, फक्त तुम्ही कॉफी पिता की नाही किंवा किती कॉफी पिता हे  महत्त्वाचे नाही, तर तुम्ही दिवसाच्या कोणत्या वेळी कॉफी पिता हेही खूप महत्त्वाचे आहे. मात्र, सकाळी कॉफी पिल्याने हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कसा कमी होतो हे अभ्यासात स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा: Cancer Risk: रोज चहा आणि कॉफी प्यायल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका होतो कमी; संशोधनात खुलासा)

संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुपारी किंवा संध्याकाळी कॉफी प्यायल्याने सर्केडियन रिदम आणि मेलाटोनिन सारख्या हार्मोन्सच्या पातळीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सूज आणि रक्तदाब यांसारख्या हृदयाशी संबंधित घटकांमध्ये बदल होऊ शकतात. टुलाने येथील प्राध्यापक डॉ. लू क्यूई म्हणाले, कॉफी पिण्याच्या वेळेच्या पद्धती आणि आरोग्यविषयक परिणामांचे परीक्षण करणारे हे असे पहिलेच संशोधन आहे.