File Image

Cancer Vaccine: आज संपूर्ण जग कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर आजाराने त्रस्त आहे. जगातील अनेक मृत्यूंसाठी हा आजार जबादार आहे. आता संपूर्ण जगासाठी दिलासा देणारा दावा रशियाने (Russia) केला आहे. रशियाने सांगितले की, त्यांनी कर्करोगाची लस तयार केली आहे जी सर्व नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असेल. सोमवारी (16 डिसेंबर), रशियन आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले की, त्यांनी कर्करोगाविरूद्ध लस विकसित केली आहे जी 2025 च्या सुरुवातीपासून रशियामधील कर्करोगाच्या रुग्णांना मोफत दिली जाईल.

रशियन सरकारी मालकीची वृत्तसंस्था TASS नुसार, रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी एका रशियन रेडिओ चॅनेलवर या लसीबद्दल माहिती दिली.

कर्करोगाच्या रुग्णांवर ही लस वापरली जाईल-

मॉस्कोमधील गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी यापूर्वी TASS ला सांगितले होते की, ही लस ट्यूमरची वाढ आणि कर्करोगाचा प्रसार रोखू शकते. ही लस साहजिकच कर्करोग रोखण्यासाठी सर्वसामान्यांना देण्याऐवजी कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाईल. ही लस प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाच्या रुग्णांना दिली जाऊ शकते. या लसीबद्दल सांगण्यात आले आहे की, ही लस केवळ ट्यूमरच्या वाढीचा वेग कमी करणार नाही, तर त्याचा आकारही कमी करेल. ही लस कर्करोगाच्या पेशी ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजन देऊन कर्करोगाचा सामना करू शकते.  (हेही वाचा: New Weight-Loss Injectable Drugs: वजन कमी करणारी Tirzepatide औषधे, नवी आशा की केवळ प्रसिद्धीचा डंका? भारतात प्रतिसाद कसा? घ्या जाणून)

रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने या घोषणेची पुष्टी केली आणि लस कशी कार्य करते हे स्पष्ट केले. ही लस कोणत्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी आहे किंवा या लसीला काय म्हटले जाईल हे सध्या स्पष्ट नाही. हे वैज्ञानिकदृष्ट्या शक्य आहे की कर्करोगाला लक्ष्य करण्यासाठी काही प्रकारची लस विकसित केली जाऊ शकते. इतर देश देखील सध्या अशाच घडामोडींवर काम करत आहेत.

बाजारात आधीच कर्करोगाची लस उपलब्ध-

याआधी 2023 मध्ये यूके सरकारने वैयक्तिक कर्करोग उपचार विकसित करण्यासाठी जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीशी करार केला आहे. याशिवाय मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या सध्या त्वचेच्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत. आधीच बाजारात अशा लसी आहेत, ज्याचे लक्ष्य कर्करोगास प्रतिबंध करणे आहे, जसे की मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) विरुद्ध लस- जी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यास मदत करते.