प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : pixabay)

Wedding Insurance : जगाच्या पाठीवर कुठेही जा लग्न हा सोहळा प्रत्येकाच्याच जीवनातला फार महत्वाचा समारंभ असतो. त्यातल्या त्यात भारतात तर लोक लग्न करण्यासाठीच जगतात असे वाटते. लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील  टर्निंग पॉइंट असल्याने फक्त कुटुंबच नाही तर, जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी असे सर्वजण या समारंभात सहभागी होतात. लग्न हा तसा खर्चिक प्रकार आहे. किती खर्च करायचा हे व्यक्तिपरत्वे अवलंबून आहे, मात्र भारतात सर्वसाधारणपणे लग्नाचे ठिकाण, जेवण, कपडे, दागिने, भांडी, विविध विधी, सजावट यांवर बक्कळ पैसा खर्च केला जातो. मात्र इतके सगळे करून लग्नाच्या दिवशी काही दुर्घटना घडली आणि या सर्वांचे नुकसान झाले तर? किंवा काही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर? कल्पनाही करवत नाही ना? म्हणूनच सध्या ट्रेंड चालू आहे तो ‘लग्न विम्याचा’ (Wedding Insurance). आतापर्यंत घराचा विमा, गाडीचा विमा, आरोग्य विमा ऐकले होते मात्र आता लोक लग्नाचाही विमा काढण्यास प्राधान्य देत आहेत.

> लग्नात येणाऱ्या खर्चानुसार ही विम्याची पॉलिसी ठरवली जाते. यामध्ये लग्नामध्ये अगदी छोट्यात छोट्या गोष्टीसाठी किती खर्च आला आहे किंवा करणार आहात हे विमा कंपन्यांना सांगणे गरजेचे असते.

> लग्न अगदी 1 लाखाचे असो वा 50 लाखाचे, तुम्ही तुम्हाला हवी ती लग्नाची पॉलिसी घेऊ शकता. कोणतेही नुकसान झाले तर तुम्हाला 100 टक्के रक्कम परत मिळू शकते. आश्चर्य म्हणजे यामध्ये तुम्ही वऱ्हाडी लोकांचाही विमा काढू शकता.

> विमा कंपन्यांकडे याबाबतीत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत. काही विमा कंपन्यांकडे लग्नाच्या 15 दिवस आधी सुरु होणाऱ्या पॉलिसीदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही तुम्हाला हवी ती पॉलिसी निवडू शकता. साधारण हा विमा लग्नाच्या 24 तास आधी सुरु होतो. यामध्ये संगीत, मेहंदी अशा प्रकारच्या विधीदेखील कव्हर होतात.

> डेस्टिनेशन वेडिंगचाही सध्या ट्रेंड आहे. अशाप्रकारच्या लग्नाचा तुम्ही विमा काढला तर, त्या विम्यामध्ये ते ठिकाण, प्रवास, अचानक काही गोष्टी रद्द होणे किंवा इतर दुर्घटनाही कव्हर होतात. मात्र यात तुम्हाला लग्नाच्या अगदी बारीकसारीक गोष्टींची माहिती तसेच दुर्घटना होणाऱ्या प्रत्येक शक्यतांची माहिती विमा कंपन्यांना द्यावी लागते.

> लग्नाच्या विम्यामध्ये सर्वसाधारणपणे व्यक्तिगत अपघात, लग्न रद्द होणे किंवा त्यात अडचण येणे, लग्नाचे स्थळ किंवा लग्नासाठी आवश्यक यंत्रणा, वस्तूंचे नुकसान झाल्यास त्यामुळे होणारे नुकसान, इतर देणी आणि पैसे यांचा समावेश असतो. मात्र लक्षात ठेवा विमा कंपनीला माहिती नसलेल्या किंवा कंपनीशी करार करताना पूर्वकल्पना न दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची भरपाई या विम्यातून मिळू शकत नाही.

नुकतेच दीपिका आणि रणवीरचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. इटलीमध्ये संपन्न झालेल्या या विवाहसोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास होती. म्हणूनच या समारंभाला कोणाची नजर लागू नये म्हणून दीपिका आणि रणवीरने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून लग्नाचा विमा घेतला होता. हा विमा 5 दिवसांसाठी लागू होता. या पॉलिसीमध्ये नैसर्गिक आपत्तीसारख्या दुर्घटनादेखील सामील होत्या. (इंटरनेटवरील माहितीच्या आधारावर हा लेख तयार केला आहे, तरी लग्नाचा विमा घेताना तुम्ही स्वतः सर्व बाबींचा विचार करून अथवा चौकशी करून तो घ्यावा)