गणपती बाप्पाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. मुंबई शहरामध्ये बाप्पाच्या या 10 दिवसांच्या पाहुणचारासाठी सारं शहर सजलं आहे. नाक्यानाक्यावर सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पा विराजमान झालेला असतो. अशामध्ये किंग्स सर्कल (King's Circle) भागातील जीएसबी सेवा मंडळाचा (GSB Seva Mandal) गणपती हा खास करून ओळखला जातो तो त्याच्या सोन्याने वेढलेल्या सौंदर्यासाठी. दरवर्षी बाप्पाचं रूप बघण्यासोबतच त्याच्या विम्याची देखील चर्चा होते. यंदा जीएसबी सेवा मंडळाने सुमारे 360 कोटींचा विमा उतरवला आहे. मागील वर्षी तो 316 कोटी होता. पण वर्षभरात सोन्याचे दर वाढले आणि त्याचा परिणाम विम्याच्या किंमतीवरही झाला आहे.
New India Assurance कडून हा विमा उतरवण्यात आला आहे. दरम्यान मंडळाने या विम्याचा प्रिमियम किती दिला आहे त्याची माहिती दिलेली नाही. जीएसबीच्या मूर्तीवर 66 किलो सोन्याचे आणि 295 किलो चांदीची आभुषणं असतात. पण यंदाचा जीएसबीच्या विम्याची रक्कम ही विक्रमी आहे.
TOI सोबत बोलताना Mandal trustee Amit Pai यांनी दिलेल्या माहितीनुसार, 360 कोटीपैकी 38.47 कोटी ही रक्कम ऑल रिस्क इंशूरंस पॉलिसी अंतर्गत आहे. ज्याद्वारा सोन्या, चांदीच्या वस्तूंची रिस्क कव्हर होते. 2 कोटी हे आगीचे आणि भूकंपासारख्या घटनांचे आहेत. तर 30 कोटींची रक्कम ही भाविक आणि पंडालच्या सुरक्षेची आहे. 289.50 कोटी हा सर्वात मोठा वाटा स्वयंसेवक आणि स्टाफसाठी आहे.
जीएसबी सेवा मंडळ किंग्स सर्कलचा गणपती हा पाच दिवसांचा असतो. त्यामुळे इतर सार्वजनिक गणपती मंडळाच्या तुलनेत या गणपतीला पहिल्या दिवसापासूनच मोठी गर्दी असते. अनेक सेलिब्रिटी देखील हमखास बाप्पाच्या दर्शनाला हजर असतात.
मुंबईत अनेक मोठ्या गणपतींसोबतच लहान सहान मंडळं देखील विमा उतरवून घेतात. यामध्ये अनेक धोके समाविष्ट असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमा आवश्यक आहे.