Man Spends 7.3 Lakh On Idli: काय सांगता? हैदराबादमधील व्यक्तीने एका वर्षात स्विगीवरून मागवली तब्बल 7.3 लाख रुपयांची इडली
Idli | Representational image (Photo Credits: pixabay)

Man Spends 7.3 Lakh On Idli: दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ इडली (Idli) हा आता जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ला जातो. त्याची चव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. इडली-चटणीची चव आणि त्याच्या सहज पचण्याजोग्या गुणामुळे लोक अनेक वेळा घरीही हा पदार्थ बनवतात. आता फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने (Swiggy) दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक इडली दिनानिमित्त त्यांचा एक खास अहवाल प्रसिद्ध केला आहे. शनिवारी 'जागतिक इडली दिना'च्या निमित्ताने कंपनीने सांगितले की, त्यांच्या हैदराबाद येथील एका युजरने गेल्या एका वर्षात तब्बल 7.3 लाख रुपयांच्या इडलीची ऑर्डर दिली आहे.

स्विगीच्या म्हणण्यानुसार, लोकांची नाश्त्यासाठी पहिली पसंती इडली आहे. स्विगीने दिलेल्या माहितीनुसार, लोकांचे इडलीवरील प्रेम केवळ नाश्त्यापुरते मर्यादित नाही, तर अनेक शहरांतील ग्राहक रात्रीच्या जेवणातही इडलीचा आनंद घेतात. प्लॅटफॉर्मवर इडलीच्या ऑर्डर्स येण्याची मुख्य वेळ सकाळी 8 ते रात्री 10 अशी आहे. इडलीप्रेमी कोणा एका शहरापुरते मर्यादित नसून ते बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोईम्बतूर आणि मुंबईसह जवळजवळ प्रत्येक शहरात पसरलेले आहेत.

स्विगीच्या म्हणण्यानुसार, इडलीने ब्रेकफास्ट टेबलवर आपले स्थान पक्के केले आहे. आकडेवारीनुसार, बेंगळुरूमध्ये रवा इडली अधिक लोकांना आवडते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये करम पोडी तूप इडली अधिक पसंत केली जाते. बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई हे शहर इडली ऑर्डर करण्याच्या बाबतीत इतर शहरांपेक्षा खूप पुढे आहेत. यानंतर मुंबई, पुणे, कोईम्बतूर, दिल्ली, वायझाग, कोलकाता आणि विजयवाडा आहेत. (हेही वाचा: Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला 'गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला)

स्विगीच्या मते, ऑनलाइन फूड डिलिव्हरीमध्ये विविधतेला मागणी आहे. असे असूनही इडलीने ब्रेकफास्ट विभागात आपले स्थान निर्माण केले आहे. मसाला डोसा नंतर इडली हा दुसरा सर्वात जास्त ऑर्डर केलेला नाश्ता आहे. स्विगीनुसार, इडलीसाठी प्रसिद्ध टॉप-5 रेस्टॉरंट्समध्ये, बेंगळुरूमधील आशा टिफिन आणि वीणा स्टोअर्स, बेंगळुरू आणि चेन्नईमधील A2B- अद्यार आनंद भवन, हैदराबादमधील वरलक्ष्मी टिफिन्स आणि चेन्नईमधील श्री अक्षयम यांचा समावेश होतो.