Fasting Recipes for Ashadhi Ekadashi Vrat (Photo credits: YouTube stills)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल-रखुमाईचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या वारीत महाराष्ट्राच्या विविध भागातून भक्तगण सहभागी होतात. पंढरपूर सोबतच महाराष्ट्रातील इतर विठ्ठल मंदिरात देखील आषाढी एकदाशीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी अनेक विठ्ठलभक्तांचे उपवास असतात. उपवासाच्या दिवशी नेमके काय खावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण साबुदाणा खिचडी, चिप्स इत्यादी पदार्थांमुळे अॅसिडीटी होण्याची संभावना असते. त्यामुळे पचण्यास हलके आणि नेहमीपेक्षा हटके, टेस्टी पदार्थ ट्राय करायला तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आषाढी एकादशी निमित्त जाणून घेऊया उपवासाचे काही वेगळे आणि चविष्ट पदार्थ... (Ashadhi Ekadashi 2019 निमित्त जाणून घ्या उपवासाचे ‘5’ आरोग्यदायी पदार्थ!)

राजगिऱ्याचा उपमा:

साहित्य:

राजगिर्‍याचा रवा

मीठ

जिरं

बदामाची पूड

शेंगदाणे

खोबरे- मिरचीची पेस्ट

कृती:

# राजगिरा भाजून त्याची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.

# कढईत तेल/तूप गरम करून त्यामध्ये जिरं, शेंगदाणे,खोबरं-मिरचीची पेस्ट टाकून गरम पाणी ओतावे.

# उकळी आल्यानंतर त्यात राजगिर्‍याचा रवा मिसळावा व चवीनुसार मीठ घालून परतावे.

# थोड्यावेळ झाकून वाफ येऊ द्यावी. म्हणजे उपमा व्यवस्थित शिजेल.

उपवासाचा ढोकळा:

साहित्य:

वरई- 1 कप (मिक्सरमधून जाडसर भरड करुन घ्यावी.)

साबुदाण्याची जाडसर पावडर- 2 चमचे

दही- अर्धा कप

आलं आणि हिरवी मिरची ठेचा- चवीपुरतं

खाण्याचा सोडा- पाव चमचा

मीठ- चवीनुसार

पाणी

कोथिंबीर

जिरं

मिरची

कृती:

# वरील सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थित मिक्स करा. त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण बनवा.

# त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटे मिश्रण तसेच ठेवा. त्यामुळे पीठ घट्टसर होईल. त्यात दोन चमचे पाणी घाला आणि पुन्हा नीट मिक्स करुन घ्या.

# त्यानंतर मिश्रणात पाव कप खाण्याचा सोडा आणि चवीपुरतं मीठ घाला. मिश्रण नीट मिक्स करा.

# एका भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण घाला. मग शिटी काढून कुकरमध्ये 20 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर पीठाचे चौकोनी तुकडे करु घ्या.

# फोडणीच्या भांड्यात तेल गरम करुन थोडं जिरं आणि मिरची घाला. मिनिटभर झाकूण ठेवा. मग तडका ढोकळ्यावर घाला. कोथिंबरी घालून ढोकळा सजवा.

आलू फ्रुट चाट:

साहित्य:

उकडलेले बटाटे- 3

अननस- 5 स्लाईस

सफरचंद- 1

डाळिंबाचे दाणे- अर्धा वाटी

हिरवी चटणी- 2 चमचे

लिंबाचा रस- 1 चमचा

चाट मसाला- 1 चमचा

जिरा पावडर- अर्धा चमचा

मीठ- चवीनुसार

तेल किंवा तूप- 2 चमचे

कृती:

# एका गरम झालेल्या पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून त्यात बटाट्याचे तुकडे घाला. बटाट्याचे तुकडे गोल्डन झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर सफरचंद सोलून त्याचे बारीक तुकडे करुन घ्या. अननसाचेही बारीक तुकडे करा.

# एका मोठ्या भांड्यात सफरचंद आणि अननसाचे तुकडे घालून मिक्स करा. मग फ्राय केलेले बटाट्याचे तुकडे घाला. मग त्यात डाळिंबाचे दाणे, काजूचे तुकडे घाला. मग चटणी आणि मीठ तुमच्या चवीनुसार घाला. चाट मसाला आणि जिरा पावडर घालून नीट मिक्स करा. आलू फ्रुट चाट तयार.

उपवासाचे दहीवडे:

साहित्य:

दही

शिंगाड्याचे पीठ- 1 वाटी

राजगिरा पीठ- 1 वाटी

जिरे

कोथिंबीर

मीठ

शेंगदाणे

मिरचीचा ठेचा

तूप

पाणी

कृती:

# एका भांड्यात शिंगाड्याचे आणि राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात जिरं, मिरचीचा ठेचा घाला. चवीनुसार मीठ घालून त्यात कोथिंबीर घाला. मग त्यात साल काढलेले शेंगदाणे आणि तूप घाला. त्यानंतर पाणी घालून पीठ मळून घ्या.

# मळलेल्या पीठाचे छोटे चपटे गोळे करुन घ्या. त्यानंतर तेलात तळून घ्या. तळलेल्या वड्यात साखर किंवा मीठ घातलेलं दही घाला. त्यावर कोथिंबीर घाला आणि उपवासाचे दहीवडे तयार.

चटणी वडा बॉल्स

साहित्य:

उकडलेल्या 3 बटाट्यांचा किस

मिरच्या

आलं

भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

मीठ- चवीनुसार

काळीमिरी पावडर- 1 चमचा

साबुदाणा पावडर- अर्धा कप

कोथिंबीर

लिंबाचा रस- 1 चमचा

तेल किंवा तूप (तळण्यासाठी)

साहित्य:

# 3 बटाट्यांचा किस, चिरलेल्या 2-3 मिरच्या, आल्याचा किस, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, मीठ, काळीमिरी पावडर, साबुदाणा पावडर, कोथिंबीर, लिंबाचा रस हे सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्या मिश्रणाचे गोलाकार वडे करुन आतमध्ये हिरवी चटणी घाला आणि त्यानंतर वडा गोल वळून बंद करा. अशा प्रकारे इतर बॉल्स बनवून घ्या.

# वळलेले बॉल्स तेलात किंवा तूपात तळून घ्या. खरपूस चटणी वडा बॉल्स तयार.

यंदाच्या आषाढी एकादशीला साबुदाणा खिचडी, वरई यांसारख्या नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त हे काहीसे हटके पदार्थ नक्की ट्राय करुन पहा.