Ashadhi Ekadashi 2019 निमित्त जाणून घ्या उपवासाचे ‘5’ आरोग्यदायी पदार्थ!
Fasting Food (Photo Credits: Foodkars/Facebook)

आषाढी एकादशी निमित्त होणारी पंढरीची वारी हे आपल्या महाराष्ट्राचं आभूषण आहे. त्या दिवशी अनेकांचे उपवास असतात. यात धार्मिक भाव असला तरी पोटाला आराम देण्यासाठी उपवास केला जातो. पण उपवास म्हटलं की साबुदाणा ठरलेला असतो. साबुदाण्याची खिचडी, बटाटा वेफर्स हे पचायला जड आणि अॅसिडिटी वाढवणारे आहेत. या पदार्थांव्यतिरिक्त राजगिरा, रताळं, अळीव यांसारखे पदार्थ खाल्यास अॅसिडिटी न होता पोट शांत राहण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त यांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु, हे पदार्थ फारसे खाल्ले जात नाहीत. म्हणून या सणानिमित्त या पदार्थांची आठवण करून नियमित खाऊया...

राजगिरा:

# राजगिऱ्याची चिक्की, लाडू आपण खातो. पण राजगिऱ्याच्या लाह्या देखील मिळतात. त्या आपण ताक किंवा दुधाबरोबर घेऊ शकतो.

# सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजगिरा हा पचायला हलका आहे.

# राजगिऱ्याने वजन वाढत नाही.

# पावसाळ्यात शरीरातील वात आणि पित्ताचे प्रमाण वाढते. पित्ताची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो.

# आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी घटक देखील यात भरपूर प्रमाणात असतात.

# पावसाळ्यात आजारांचं प्रमाण देखील वाढतं. आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. राजगिऱ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

# ऑफिसमधून निघताना भूक लागते आणि त्यावेळी वडा-समोसा असे पदार्थ खाल्ले जातात. किंवा काहीही न खाल्यास थकवा येतो आणि चिडचिड वाढते. अशावेळी राजगिऱ्याच्या किंवा साळीच्या लाह्या खाल्यास हा त्रास कमी होईल.

अळीव:

# पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि थकवा जास्त येतो. हा थकवा दूर करण्यासाठी अळीव पाण्यात भिजत ठेवा. 2 तासांनी ते कुस्करा आणि गाळून त्याचं चिकट पाणी प्यायल्याने फायदा होतो.

# यात आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही मिनरल्स आणि बी कॉम्प्लेक्स व कॅरोटीन हे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात मिळतं.

# अॅनेमिया दूर करण्यासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे.

# सांधेदुखी, कंबरदुखीवर अळीव अतिशय फायदेशीर आहे.

# जिम करणाऱ्यांनी इतर सप्लिमेंट्स पेक्षा अळीव घेतल्यास फायदा होईल. कारण त्यामुळे फॅट्स न वाढता एनर्जी आणि स्टॅमिना वाढेल.

डिंक:

# बाभळीच्या झाडापासून डिंक मिळतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळे मरगळलेले दिसतात. तर ही मरगळ दूर करून फ्रेशनेस, रसरशीतपणा आणण्यासाठी डिंक उपयुक्त आहे.

# यात कार्बोहायड्रेट्स 20% आणि सोल्युबल फायबर्स आहेत. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

# अतिरिक्त चरबी कमी होण्यास डिंक अतिशय उपयुक्त आहे.

# डिंक भाजून फुलवून घ्या. मग पाण्यात भिजवून दुधात घालून तुम्ही खाऊ शकता.

शिंगाडा:

# शिंगाड्यामुळे गर्भाचं पोषण होण्यास मदत होते.

# स्नायू मजबूत होण्यासाठी फायदा होतो.

# शिंगाड्यामध्ये आयोडीन असतं. त्यामुळे आयोडीनची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते.

शिंगाडा थंड पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या आणि दुधासोबत खा.

रताळं:

# रताळं हे खूप चांगलं फिलर आहे. म्हणजेच उपवासात पोट भरण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

# रताळ्यात कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज असून इसेन्शियल अमायनो अॅसिड्स आहेत. त्याचबरोबर आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, क्रोमियम ही मिनरल्स आहेत. तसंच अँटिऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे हृदयविकार आणि कॅन्सरविरुद्ध लढण्याची क्षमता रताळ्यात आहे.

# तसंच रताळ्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

त्यामुळे यंदाच्या एकादशीला पारंपारिक साबुदाणा सोडून यापैकी एखाद्या पदार्थाचा आस्वाद जरुर घ्या. तसंच केवळ एकादशीचं नाही तर इतर उपवासादरम्यानही तुम्ही हे हेल्दी पदार्थ ट्राय करु शकता.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)