Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi In Marathi: मार्गशीर्ष (Margashirsha) हा हिंदूंसाठी पवित्र महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात महालक्ष्मी व्रत (Mahalakshmi Vrat) पाळले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हे व्रत केले जाते. यानिमित्ताने अनेक घरांमध्ये श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातही मांसाहार केला जात नाही. त्यामुळे या वर्षी हा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आणि किती दिवस चालणार? त्याबद्दल जाणून घेऊयात. या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्या गुरुवारी महालक्ष्मी व्रत पाळले जाणार आहे, याचीही माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला घट सजवणे आणि या दिवशी पूजेनुसार इतर तयारी करणे सोपे जाईल.
यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होईल?
महाराष्ट्रात यावर्षी 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे. तर पहिला गुरुवार 14 डिसेंबरला आहे. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.24 वाजता अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होईल. मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होत असून हा महिना 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5:27 वाजता संपेल. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 4 तारखेला महालक्ष्मी व्रत पाळण्यात येणार आहे. (हेही वाचा - Margashirsha Guruvar Vrat 2023 Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी कथा काय? घ्या इथे जाणून)
मार्गशीर्ष गुरुवार 2023 व्रताच्या तारखा -
- पहिला गुरुवार - 14 डिसेंबर
- दुसरा गुरुवार - 21 डिसेंबर
- तिसरा गुरुवार - 28 डिसेंबर
- चौथा गुरुवार - 4 जानेवारी
मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घटस्थापना करण्याची परंपरा आहे. दर गुरुवारी कलश मांडणी करून महालक्ष्मीची कथा वाचून पूजा केली जाते. महिला सकाळ संध्याकाळ घटपूजा करून दिवसभर उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिलांसाठी हळदी कुमकुम कार्यक्रम आयोजित केला जातो. यानिमित्ताने सव्वाष्ण महिलांना त्यांच्या घरी बोलावून हळदी कुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू दिल्या जातात.