विश्वकर्मा पूजा 2019 (Photo Credits: Wikimedia)

Vishwakarma Jayanti 2020 Importance: हिंदू धर्मानुसार देवतांचे शिल्पकार आणि विश्व निर्माण करणारे पहिले इंजिनीयर म्हणून संबोधले जाणारे प्रभू विश्वकर्मा यांची आज जयंती. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार दरवर्षी 16 किंवा 17 सप्टेंबरला ही जयंती साजरी केली जाते. ज्याला विश्वकर्मा पूजा नावाने देखील ओळखले जाते. मात्र गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात ही जयंती फेब्रुवारीमध्ये साजरी केली जाते. ज्यानुसार, यंदा ही जयंती 7 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रभू विश्वकर्मांना प्रसन्न करण्यासाठी कारखान्यांत आणि कंपन्यांमध्ये यंत्रांची पूजा केली जाते. असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होते आणि त्या व्यक्तीला जीवनात कुठल्याही आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत नाही असे पुराणात म्हटले आहे.

पुराणात म्हटल्याप्रमाणे, देवी-देवतांच्या अस्त्र-शस्त्रांचे निर्माण प्रभू विश्वकर्मांने केले होते. इतकेच नव्हे तर इंद्रपुरी, द्वारका, हस्तिनापूर, स्वर्ग लोक आणि सोन्याची लंका देखील त्यांनीच निर्माण केली होती. म्हणूनच या दिवसाला फार महत्त्व आहे. अशा या महान विश्वकर्त्याचा जन्म 17 सप्टेंबर रोजी झाल्याचे मानले जात असून हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो. प्रभू विश्वकर्मा यांच्या जन्माबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असून विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मा यांच्या पुत्र धर्माच्या सातव्या संतान वास्तु देवाच्या 'अंगिरसी' नावाच्या पत्नीद्वारे झाल्याचे मानले गेले आहे.

पूजा मुहूर्त:

या त्रयोदशी तिथीला सुरुवात 6 फेब्रुवारीला सायंकाळी 8.23 मिनिटांनी होणार असून 7 फेब्रुवारीला सायंकाळी 6.31 मिनिटांनी समाप्ती होणार आहे.

पूजा विधी:

सर्वात आधी पूजा सामुग्री जसे अक्षता, फुलं, मिठाई, रोली, सुपारी, फळं, धूप, रक्षा सूत्र, दही याची व्यवस्था करुन घ्या. सकाळी लवकर उठून स्नान करुन पांढरे वस्त्र नेसावे. पूजा घरात प्रभू विश्वकर्मा यांची प्रतिमा किंवा फोटो स्थापित करावी. त्यावर फुलं, माळ, अपिर्त करा. पिवळे किंवा पांढरे फुलं अर्पित करणे योग्य ठरेल. तुपाचा दिवा लावावा, उदबत्ती लावावी. नंतर सर्व शस्त्र, वाहन, मोटर इतर वस्तूंची पूजा करावी. सर्व शस्त्रांना तिलक करुन अक्षता लावून फुलं अर्पित करावे. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवावा. हातात अक्षता, फुलं घेऊन देवाची आराधना करावी.

या दिवशी ऑफिस, उद्योग, दुकानदार, फॅक्ट्रीज येथे लागलेल्या मशीन पुजल्या जातात. लोकांचे असे मानने आहे की या दिवशी यंत्रांची पूजा केल्यास आणि प्रभू विश्वकर्मांची आराधना केल्यास यंत्रे लवकर खराब होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या पूजेचे महत्व खूप वाढले आहे.