Tallest Ganesh Idol in India Streaming Online: देशातील सर्वात उंच Khairatabad Ganesh मूर्तीची स्थापना; घरबसल्या घ्या Live दर्शन
Khairatabad Ganesh (संग्रहित संपादित प्रतिमा)

आज पाहून (10 सप्टेंबर) देशभरात 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात या सणाची मोठी धामधूम पाहायला मिळते, मात्र भारतामधील इतर राज्यांतही गणेशोत्सव उत्साहात साजरा होतो. हैद्राबादमधील ‘खैरताबाद गणपती’ (Khairatabad Ganesh) हा तर देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. देशातील सर्वात उंच मूर्तीसाठी हा गणपती ओळखला जातो. यावर्षी इथे 40 फूट उंच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून, दीडशेहून अधिक कलाकारांनी मिळून यंदाची मूर्ती बनवली आहे.

खैरताबाद गणेश उत्सव आयोजक एस. राजकुमार यांनी सांगितले की, या वर्षी गणेशाची पंचमुखी रुद्र महागणपती मूर्ती बनवण्यात आली आहे. मूर्ती बनवण्यासाठी दोन महिने लागले. राजेंद्रन हे मुख्य कारागीर आहेत. त्यांच्या 150 हून अधिक कलाकारांच्या टीमने 10 जुलैपासून मूर्ती बनवण्यास सुरुवात केली होती. यामध्ये आंध्र प्रदेश व्यतिरिक्त मुंबई येथील कलाकारही सहभागी झाले होते. चिकणमाती, पीओपी, बांबू इत्यादी गोष्टींच्या मदतीने मूर्ती तयार केली जाते.

गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून, दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. तुम्ही देखील घरबसल्या ऑनलाईन या गणपतीचे दर्शन घेऊ शकता.

(हेही वाचा: Ganeshotsav 2021: मोरगावचा मोरेश्वर'-अष्टविनायकामधील पहिला गणपती; मंदिर, मूर्ती आणि पौराणिक महत्व, घ्या जाणून)

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन होते, त्यामुळे येथे सुमारे 9 फुटांची मूर्ती बसवण्यात आली होती. यापूर्वी 2019 मध्ये 61 फूट उंच मूर्ती होती, ज्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. कोरोनापूर्वी, येथे भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लाखांमध्ये होती, परंतु गेल्या वर्षी खूप कमी लोक येथे आले होते. दरम्यान, 1954 साली ही मूर्ती बसवण्यास सुरुवात झाली होती. सिंगरी कुटुंबीय हा गणेशोत्सव आयोजित करते. 2018 पासून इथे पर्यावरणपूरक मूर्ती बसवण्यास सुरुवात झाली.