
ख्रिसमसला (Christmas) आता फक्त एक दिवस शिल्लक आहे. प्रत्येक वर्षी 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा वाढदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिश्चन समाजातील लोक येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानतात आणि या धर्माच्या लोकांसाठी हा सर्वात मोठा सण मानला जातो. आता तर फक्त ख्रिश्चनच नाही तर इतर धर्मातील लोकही हा सण साजरा करतात.
मात्र फारच थोड्या लोकांना हे माहित असेल की, बर्याच देशांमध्ये ख्रिसमस हा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. म्हणजे काही ठकाणी हा सण 6 जानेवारी, तर काही ठिकाणी 7 जानेवारीला साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत.
ग्रेगोरियन कॅलेंडर आणि ज्युलियन कॅलेंडरमध्ये असणाऱ्या फरकामुळे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या दिवशी ख्रिसमस साजरा होतो. पोप ग्रेगरीने ग्रेगोरियन कॅलेंडर सुरु केले आणि त्या कॅलेंडरनुसार ख्रिसमस उत्सव 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोप ग्रेगरी कॅलेंडर आणि ज्युलियन कॅलेंडरमध्ये 13 दिवसांचे अंतर आहे. यानुसार, वेगवेगळ्या कॅलेंडरचे अनुसरण करणारे लोक वेगवेगळ्या दिवशी हा उत्सव साजरा करतात. ज्युलियन कॅलेंडर ज्युलियस सीझर यांनी इसवीसन पूर्व 45 मध्ये सुरू केले, त्यानुसार 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा होतो. (हेही वाचा: Christmas 2019: 'ख्रिसमस'चा सण साजरा करण्यासाठी सुंदर सजवा तुमचा ख्रिसमस ट्री; या 5 डेकोरेशन आइडियाजची होईल मदत)
याचा अर्थ अवघ्या काही शतकांपासून 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. ग्रीस, रोमानिया येथे 1923 पासून 25 डिसेंबरला ख्रिसमस उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. रशिया, युक्रेन, इस्त्राईल, इजिप्त आणि बल्गेरिया इत्यादी देशांत जानेवारी महिन्यात ख्रिसमस उत्सव साजरा करतात. त्याचबरोबर सर्बिया, बेलारूस, मॉन्टेनेग्रो, कझाकस्तान, मॅसेडोनिया, इथिओपिया, ज्योर्जिया इत्यादी देशांमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो. आर्मीनिया अपोस्टोलिक चर्च येशूचा वाढदिवस 6 जानेवारीला साजरा करतात, तर रशियन ऑर्थोडॉक्स चर्च 7 जानेवारीला हा उत्सव साजरा करतात.