Sankashti Chaturthi December 2020: डिसेंबर महिन्यात संकष्टी चतुर्थी आज म्हणजेच गुरुवार, 3 डिसेंबर रोजी आहे. संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयाची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. कारण त्या वेळेनुसार गणपती बाप्पाची पूजा, आरती, चंद्रदर्शन योजले जाते. त्यानंतर भाविक उपवास सोडतात. प्रत्येक महिन्यात येणारी 'संकष्टी चतुर्थी' सर्व गणेशभक्तांसाठी अत्यंत खास असते. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं आता खुली झाली आहेत. त्यामुळे काही महिने संकष्टी निमित्त बाप्पाचे दर्शन घेऊ न शकलेल्या भाविकांना आता दर्शनासाठी मंदिरांची दारं खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षातील ही शेवटची संकष्टी भाविकांसाठी नक्कीच खास आहे. मात्र अद्याप कोविड-19 चे संकट टळलेले नसल्याने गर्दी टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाची साग्रसंगीत पूजा करुन नैवेद्य दाखवला जातो. आरती करुन चंद्रदर्शन घेऊन मग उपवास सोडला जातो. त्यामुळे आजच्या संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा कशी करावी आणि चंद्रोदयाची वेळ काय जाणून घेऊया...
संकष्टी चतुर्थी दिवशी काय आहे चंद्रोदयाची वेळ?
3 डिसेंबर रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी 8.30 वाजता चंद्रोदय होणार आहे.
संकष्टी चतुर्थी दिवशी कशी कराल पूजा?
चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढा. त्यावर हळद कुंकू वाहा. चौरंग/पाट मांडल्यानंतर त्यावर लाल वस्त्र अंथरा. त्यावर गणपती बाप्पाची प्रतिमा किंवा मुर्ती मांडा. मुर्ती-प्रतिमेवर दूध-पाण्याचा अभिषेक करुन हळद कुंकू, अक्षता वाहाव्या. फुलं, दुर्वा, शमीची पाने वाहावी. दिवा, अगरबत्ती ओवाळा. मुर्ती शेजारी तांदळाने चंद्राची कोर काढून त्याची देखील पूजा करावी. मुर्ती समोर पानाचा विडा, फळं मांडा. घरी बनवलेल्या सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर आरती करा. चंद्रदर्शन करुन उपवास सोडा.
दरम्यान, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता.
संकष्टी चतुर्थी शुभेच्छा!
सुख, समृद्धी, आनंद, सौख्य प्राप्तीसाठी अनेक भाविक संकष्टी चतुर्थी निमित्त गणरायची मनोभावे पूजा करतात. यंदाच्या संकष्टी चतुर्थी दिवशी मंदिरंही खुली झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल, यात शंकाच नाही.