Republic Day 2024: येत्या 26 जानेवारी रोजी भारत साजरा करणार 75 वा प्रजासत्ताक दिन; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron असतील सोहळ्याचे प्रमुख पाहुणे
France President Emmanuel Macron (Photo Credits: Getty Images)

येत्या 26 जानेवारी रोजी होणार्‍या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Indian Republic Day 2024) समारंभात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (French President Emmanuel Macron) हे प्रमुख पाहुणे असतील. फ्रान्सच्या राष्ट्रपतींना 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते व अहवालानुसार त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली की, मॅक्रॉन भारत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन या समारंभात सहभागी होणार असल्याने, दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात फ्रेंच नेता सहभागी होण्याची ही सहावी वेळ असेल. मॅक्रॉन यांच्या आधी, 1976 आणि 1998 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक (Jacques Chirac)  हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या आधी, माजी राष्ट्रपती व्हॅलेरी गिस्कार्ड डी'एस्टिंग (Valery Giscard d'Estaing), निकोलस सारकोझी (Nicolas Sarkozy) आणि फ्रँकोइस ओलांद (Francois Hollande) हे अनुक्रमे 1980, 2008 आणि 2016 मध्ये प्रमुख पाहुणे होते.

यापूर्वी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट झाली होती. बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी फ्रान्सला गेले होते. ते सन्माननीय पाहुणे म्हणून परेडमध्ये सहभागी झाले होते. खुद्द फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले होते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला शुभेच्छाही दिल्या होत्या. (हेही वाचा: Ram Temple Inauguration: अयोध्येत 22 जानेवारीला केवळ निमंत्रित आणि सरकारी ड्युटीवर असलेल्या लोकांनाच प्रवेश; हॉटेल्सचे प्री-बुकिंग होणार रद्द)

या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या G20 बैठकीत सहभागी होण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दिल्लीत आले होते. या काळात, G20 बैठकीव्यतिरिक्त पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठकही झाली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत-फ्रान्स संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. दोन्ही नेत्यांनी संरक्षण भागीदारी वाढवण्याची वचनबद्धताही व्यक्त केली होती. भारताने फ्रान्सकडूनच राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती.