Ram Temple Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी अयोध्येत पोहोचले, जिथे त्यांनी राम मंदिराचे (Ram Temple) बांधकाम आणि सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले की, 22 जानेवारीला निमंत्रण पत्राशिवाय कोणीही अयोध्येत येऊ शकणार नाही. जर कोणी या तारखेला शहरातील हॉटेल्सचे प्री-बुकिंग केले असेल तर ते रद्द केले जाईल.
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील अनेक व्हीव्हीआयपी व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्या शहराचे रूपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये होणार आहे.
सीएम योगी यांनी गुरुवारी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि अनेक कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सीएम योगी यांनी आदेश दिले की, 22 जानेवारीला अयोध्येतील सर्व धर्मशाळा आणि हॉटेल्सचे प्री-बुकिंग रद्द करण्यात यावे. या दिवशी ज्यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण आहे आणि जे सरकारी ड्युटीवर असतील तेच अयोध्येत येतील. निमंत्रण पत्र आणि ड्युटी पास असल्याशिवाय इतर कोणाला अयोध्येत प्रवेश नसेल. ज्यांनी आधीच 22 जानेवारीसाठी अयोध्येतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे बुकिंग केले आहे, त्यांचे बुकिंगही रद्द केले जाईल. (हेही वाचा: Mosque in Ayodhya: मक्केतील इमाम करणार अयोध्येतील मशिदीची पायाभरणी; ताजमहालपेक्षाही सुंदर असेल वास्तू, जगातील सर्वात मोठे कुराण ठेवले जाणार)
आमंत्रित लोकांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 100 हून अधिक विमाने अयोध्या विमानतळावर उतरतील. या काळात वाहतूक मार्गातही बदल करण्यात येणार आहेत. राम मंदिराचे उद्घाटन हा मोठा कार्यक्रम मानला जात आहे. या प्रकारात कोणताही विघ्न येऊ नये यासाठी तयारी करण्यात येत आहे.