PM Narendra Modi Maharashtra Visit: येत्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्रात 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. भारतातील सर्वात लांब सागरी पूल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) पूर्ण झाला आहे. शुक्रवारी, 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ या पुलाला 'अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे.
समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. अटल सेतू पूल 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21 किलोमीटर आणि 800 मीटर लांबीच्या या पुलाचा साडेसोळा किलोमीटरचा भाग समुद्रावर तर साडेपाच किलोमीटर जमिनीवर आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांनी या पुलाची पायाभरणी केली होती.
यासह पीएम मोदी मरीन ड्राइव्ह ते इस्टर्न फ्रीवे, ऑरेंज गेट यांना जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्यासाठी पायाभरणी करतील. हा 9 किलोमीटर लांबीचा 200 मीटर लांबीचा बोगदा 8,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच ते देशातील तरुणांना संबोधित करणार आहेत. (हेही वाचा: Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरात टॅक्सी-रिक्षा चालकांचा बंद, नागरिकांचे हाल)
राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी, त्यांच्या विचार आणि आदर्शांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. यावर्षी अनेक शासकीय विभागांच्या सहकार्याने जिल्ह्यातील युवक कार्य विभागाच्या सर्व प्रादेशिक संघटना राष्ट्रीय युवा दिन साजरा करणार आहेत. देशातील प्रमुख शहरे आणि साडेसातशे जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. उत्सवादरम्यान, विविध राज्यांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांदरम्यान विविध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित केला जाईल.