Auto Rickshaw (Photo Credits: PTI)

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील रिक्षाचालक (Rickshaw Driver) आणि टॅक्सी चालकांनी (Taxi Driver) बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून शहरातील रिक्षा आणि ग्रामीण भागातून शहारत येणाऱ्या काळी पिवळी टॅक्सी संपूर्णपणे बंद आहे. यामुळे  शहरात धावणाऱ्या सिटी बसमध्ये (City Bus) मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.  केंद्र सरकारने नवीन वाहन कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज मध्यरात्रीपासून ट्रकचालक आणि इंधन टँकर चालकांनी संपाची हाक दिली आहे. त्यांच्या याच संपला शहरातील रिक्षा चालकांनी देखील पाठिंबा दिला आहे. (हेही वाचा - Hit-and-Run Law: नवीन हिट-अँड-रन कायद्याबाबत सरकारने आश्वासनानंतर मालवाहतूक सुरळीतपणे सुरू)

छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा 10 जानेवारीला बंद असणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून रिक्षा चालकांकडून देण्यात येत होती. यासाठी अनेक रिक्षांवर त्याबाबत लेखी सूचना देखील लिहिण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळपासून शहरातील रिक्षा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या संभाजीनगरकरांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपानंतर छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर रास्ता रोको देखील करण्यात आला. पैठण रस्त्यावरील गेवराईजवळ काही रिक्षा चालकांनी रास्ता रोको केला. त्यांच्या याच आंदोलनात अवजड वाहन चालकांनी देखील सहभाग नोंदवला.