हिट-अँड-रन कायद्याच्या (Hit-And-Run Law) विरोधात देशभरात आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांना (Truckers) त्यांचे आणि सरकारचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या परिवहन मंडळामध्ये संध्याकाळी उशिरा झालेल्या करारानंतर ताबडतोब पुन्हा काम सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले. हिट-अँड-रन प्रकरणांमध्ये दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करणारा नवीन नियम अद्याप लागू झालेला नाही, परिवहन मंडळाशी चर्चा केल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे सरकारने सांगितले. दरम्यान आज सकाळपासून मालवाहतूक सुरळीतपणे सुरू झाल्याचे चित्र आहे. (हेही वाचा - Hit-and-Run Law: नवीन हिट-अँड-रन कायद्याबाबत देशभरातील चालकांचा संप मिटला; सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय)
मागील दोन दिवसांपासून मालवाहतूकदार, टँकरचालकांचा संप सुरू असल्याने राज्यासह अनेक ठिकाणी इंधनापासून ते भाजीपाला, अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबला होता. देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पेट्रोलपंप इंधनाअभावी ओस पडले होते. तर, पेट्रोल भरून घेण्यासाठी ठिकठिकाणी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा लागल्या होत्या. या सर्व गोष्टीमुळे नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला होता. यामुळे केंद्र सरकारने लवकर तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलले.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.